
मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांची लेक झाली मुंबई पोलीस; वाघोदे गावात जल्लोषात स्वागत
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील वाघोदे येथील मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांची लेक चैताली रामकृष्ण पाटील हिची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून नुकतेच तिने नागपूर येथे आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. प्रशिक्षण पूर्ण करून गावी परतल्यानंतर वाघोदे ग्रामस्थांनी तिचे जोरदार स्वागत करत गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढली.
याबाबत अधिक माहिती अशी की, चैतालीचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर चैतालीने पोलीस दलापर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी तिच्या मोठ्या भावाची पवन याची भारतीय सैन्य दलात निवड झाली असून तो सध्या देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत आहे. भावापाठोपाठ आता चैताली देखील मुंबईकरांच्या सेवेसाठी पोलीस दलात कार्यरत होणार आहे. कुटुंबात कोणतीही शासकीय पार्श्वभूमी नसताना आणि आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही केवळ अभ्यास व मेहनतीच्या जोरावर चैताली आणि तिच्या भावाने यश संपादन करून आजच्या तरुणांसमोर आदर्श उभा केला आहे. मुलींनीही संधी मिळाल्यास कुटुंबाचे नाव उज्ज्वल करू शकतात, हे चैतालीने आपल्या यशातून दाखवून दिले आहे. चैतालीने वाघोदे गावाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल भाजपाचे जानवे मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील, दामू अण्णा पाटील, राहुल पाटील, हितेश पाटील व मयूर पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी तिची भव्य मिरवणूक काढली. तसेच तिच्या आई-वडिलांचा सत्कार करून चैतालीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply