
महसूल अधिकारी व पोलिसांसमोरून वाळू माफियांनी दोन ट्रॅक्टर पळवले; सिनेस्टाईल पाठलागानंतरही चालक फरार
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नीम गावालगत तापी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करताना महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेले दोन ट्रॅक्टर चालकांनी महसूल अधिकारी व पोलिसांसमोरूनच पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिस व महसूल अधिकाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग केला, मात्र भरधाव वेगाने ट्रॅक्टर घेऊन चालक फरार होण्यात यशस्वी झाले. या घटनेची दिवसभर परिसरात जोरदार चर्चा होती.
२९ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता मंडळ अधिकारी प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी भावेश वाघ, सचिन बमनाथ, भुषण पाटील, विक्रम कदम, विकेश भोई, मुकेश देसले, मनोहर पाटील, मंडळ अधिकारी संजय चव्हाण, पुरुषोत्तम पाटील व रविंद्र बेलदार आदींचे पथक अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात गस्त घालत होते.
नीम गावालगत तापी नदीपात्रात दोन विनाक्रमांक ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून ट्रॉली भरताना पथकाला आढळले. अधिकाऱ्यांनी चालकांना ट्रॅक्टर तहसील कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले. मात्र चालक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पथकाने एक स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा विनाक्रमांक ट्रॅक्टर (इंजिन क्रमांक :DG4001SGN39074
तसेच दुसरा निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली असा दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेतला.
घटनेची माहिती तहसीलदार सुराणा यांना देण्यात आली. त्यानंतर मारवड पोलिसांना पाचारण करण्यात आले. ट्रॅक्टर नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी दोन्ही ट्रॅक्टरवर प्रत्येकी दोन ग्राम महसूल अधिकारी बसले. मात्र चढ चढताना ट्रॅक्टर पुढे जात नसल्याने चालकांनी ट्रॉलीतील वाळू खाली करावी लागेल, असे सांगितले. महसूल अधिकारी खाली उतरल्यावर चालक वाळू खाली करत असल्याचे पथकाने व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले.
याच संधीचा फायदा घेत एका चालकाने ट्रॅक्टर मांजरोदच्या दिशेने, तर दुसऱ्याने कपिलेश्वर मंदिराच्या दिशेने भरधाव वेगाने पळवून नेला. महसूल अधिकारी व पोलिसांनी तत्काळ सिनेस्टाईल पाठलाग केला. मात्र चालकांनी जीवाची पर्वा न करता भरधाव वेगाने ट्रॅक्टर पळविल्याने ते पसार झाले.
या प्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात दोन्ही ट्रॅक्टर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहेत.

Leave a Reply