अमळनेरकरांच्या माथी सहा-सात दिवसांनी पाणी! पालिकेचे नियोजन ठरले कुचकामी

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून तीन दिवसांआड मिळणारे पाणी आता सहा ते सात दिवसांनी मिळू लागले आहे. जळोद डोहातील पाणीसाठा डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांपर्यंतच पुरण्याची शक्यता असल्याने शहरावर भीषण जलसंकट घोंघावत आहे. दुष्काळाचे संकट स्पष्ट असतानाही पालिकेने वेळीच पर्यायी पाणीपुरवठ्याचे नियोजन न केल्याने नागरिकांना पाण्यासाठी हाल सोसावे लागत आहेत. याचे उत्तर सत्ताधाऱ्यांना द्यावे लागेल.

अमळनेर शहराला जळोद येथून तापी नदीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी ३४० अश्वशक्तीचे दोन आणि २७५ अश्वशक्तीचे दोन पंप कार्यरत आहेत. शहरात सुमारे २५ हजार मालमत्ता असून १८ हजार नळजोडण्या आहेत. आतापर्यंत जुन्या गावात चार दिवसांआड, तर कॉलनी परिसरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. मात्र, जळोद डोहातील पाणीसाठा ५ ते १० डिसेंबरपर्यंतच पुरण्याची शक्यता असल्याने पाणीपुरवठ्याचे अंतर वाढवण्यात आले आहे. त्यामुळे सहा ते सात दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन गरजांसाठीही पाण्याची जुळवाजुळव करावी लागत आहे.

दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता पालिकेने आणि प्रशासनाने पाण्याचे पर्यायी स्रोत आधीच कार्यान्वित करणे अपेक्षित होते. शहरात पालिकेच्या १९ विहिरी आणि २४ सार्वजनिक बोअरवेल उपलब्ध असतानाही त्यांचा पुरेसा वापर करण्याचे नियोजन वेळेत झाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विहिरींचा गाळ काढणे, बोअरवेल पुनर्जीवित करणे आणि पर्यायी पंपांची व्यवस्था करणे या उपाययोजना पाणीटंचाई तीव्र झाल्यानंतर पुढे येत आहेत. हतनूर धरणातून तीन आवर्तने राखीव ठेवण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी गिरणेचे पाणी तापी नदीत न आल्यास १५ डिसेंबरपर्यंत पहिले आवर्तन घ्यावे लागणार आहे. म्हणजेच आगामी काळातील पाणीपुरवठा गिरणेच्या पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. दुष्काळाचे संकट नैसर्गिक असले, तरी त्याचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन करणे ही पालिकेची जबाबदारी आहे. केवळ नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करून प्रश्न सुटणार नाही. उपलब्ध विहिरी, बोअरवेल आणि पर्यायी जलस्रोतांचा तातडीने वापर करून नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

गिरणेचे पाणी आले तरच तात्पुरता दिलासा!

 

येत्या तीन चार दिवसात गिरणेचे पाणी तापीत आल्यास काही दिवस अडचणी दूर होतील मात्र ते न आल्यास पहिले आवर्तन घेतले जाईल. आवर्तन न मिळाल्यास कलाली डोहातील ६५ अश्वशक्तीच्या ३ पंपाद्वारे शहराला पाणीपूरवठा केला जाईल.

– सत्यम पाटील ,पाणी पुरवठा अभियंता ,अमळनेर नगरपरिषद

 

ऑगस्ट २०२७ पर्यंत तिन्ही आवर्तने पुरली पाहिजेत

 

पाण्याचे संकट नैसर्गिक आहे. सर्वांनी एकत्र येऊन संकटाला सामोरे जायचे आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि पालिकेला सहकार्य करावे , पाणी वाया घालवू नये. ऑगस्ट २०२७ पर्यंत तिन्ही आवर्तन पुरले पाहिजे.

– डॉ. बाविस्कर , नगराध्यक्ष अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *