
विद्यार्थ्यांनो, शिक्षणासोबत संस्कारांचीही शिदोरी घ्या : मान्यवारांचे आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान मिळविण्यावर भर न देता स्वतःमध्ये नैतिक मूल्ये, संस्कार, शिस्त, स्वच्छता आणि अध्यात्मिक विचार रुजवावेत. लहान वयात झालेले संस्कार आयुष्यभर व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उत्तम संस्कारांचेही धडे आत्मसात करावेत, असे आवाहन विविध मान्यवरांनी केले.
मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्यांची रुजवण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांतर्गत बुधवार, ५ ऑगस्ट आणि गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी शहरातील द्रौ. रा. कन्या शाळा आणि भगिनी मंडळ येथे मंगल बालसंस्कार केंद्रांतर्गत बालसंस्कार वर्ग घेण्यात आले. या वर्गांमध्ये मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात संस्कार, शिस्त आणि अध्यात्मिक विचारांचा अंगीकार कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच बालवयातच चांगल्या सवयी लावून घेण्याचे आणि त्यांची आयुष्यभर जपणूक करण्याचे आवाहन करण्यात आले.
तीन वर्षांपूर्वी स्थापन झाले मंगल बालसंस्कार केंद्र
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांपूर्वी मंगल बालसंस्कार केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी अमळनेर शहरातील विविध शाळांमध्ये बालसंस्कार वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये, भारतीय संस्कृती, शिस्त, स्वच्छता आणि आध्यात्मिक विचारांची ओळख करून दिली जाते.
यंदाही या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून बुधवारी द्रौ. रा. कन्या शाळेत, तर गुरुवारी भगिनी मंडळ येथे बालसंस्कार वर्ग घेण्यात आले.
मंत्र, बालगीते अन् बालगोष्टींतून संस्कारांचे धडे
द्रौ. रा. कन्या शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला खानदेश शिक्षण मंडळाच्या संचालिका वसुंधराताई लांडगे, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त डी. ए. सोनवणे, वेदशास्त्र संपन्न केशव पुराणिक, जयेंद्र वैद्य आणि शुभम वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सरस्वतीमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध मंत्र, बालगीते आणि बालगोष्टींच्या माध्यमातून संस्कारांचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन दिनचर्येत शिस्त, स्वच्छता, वेळेचे नियोजन, मोठ्यांचा आदर आणि चांगल्या सवयी यांचा समावेश कसा करावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेत चांगले गुण मिळविणे हेच ध्येय न ठेवता चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानाबरोबरच संस्कार आणि सद्विचार अंगीकारल्यास व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
या कार्यक्रमास द्रौ. रा. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सीमाताई सूर्यवंशी, पर्यवेक्षिका आर. एस. सोनवणे तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगल बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात बालवयातच संस्कारांची बीजे रुजविण्याचा उपक्रम सुरू असून, अशा उपक्रमांतून शाळकरी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत आहे.

Leave a Reply