
श्रावणाच्या पहिल्याच दिवशी १३ रोजी अमळनेरमध्ये कावड यात्रेचा जल्लोष; हजारो शिवभक्त होणार सहभागी
अमळनेर (प्रतिनिधी) श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी अमळनेरमध्ये हर हर महादेवच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानाच्या वतीने गुरुवार, १३ रोजी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत अमळनेरसह परिसरातील हजारो शिवभक्त सहभागी होणार असून, जळोद येथील सूर्यकन्या तापी नदीच्या पात्रातून पवित्र जल आणून वर्णेश्वर महादेवाला अर्पण करण्यात येणार आहे.
श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानाचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या संकल्पनेतून गेल्या १२ वर्षांपासून ही कावड यात्रा मोठ्या भक्तिभावाने आयोजित केली जात आहे. यंदाही यात्रेला भव्य स्वरूप देण्यात आले असून, शिवभक्तांमध्ये या यात्रेबाबत मोठा उत्साह निर्माण झाला आहे. रढावण, सुंदरपट्टी, हेडवे, नंदगाव, तासखेडा, सानेनगर, गांधली, अमळगाव तसेच अमळनेर शहरातील हजारो शिवभक्त कावड यात्रेत सहभागी होणार आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व शिवभक्तांनी सकाळी ९ वाजेपर्यंत दगडी दरवाजा आणि श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान येथे एकत्र जमावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. त्यानंतर सर्व शिवभक्त वाहनाने जळोद येथे सूर्यकन्या तापी नदीच्या पात्रात जाणार आहेत. तेथे तापीमाईचे पूजन करून कावडीमध्ये पवित्र जल भरण्यात येईल. त्यानंतर वाजंत्रीच्या गजरात, हर हर महादेवच्या जयघोषात आणि नाचत-गात शिवभक्त अमळनेरच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत.
या कावड यात्रेला शहरातील तसेच शहराबाहेरील शेकडो शिवभक्त भेट देणार असल्याने अमळनेर-जळोद मार्गावरही भक्तिमय वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
पायी येणे शक्य नसणाऱ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन
पवित्र श्रावण महिन्यात कावड यात्रेत सहभागी होऊन पुण्यलाभ घ्यावा आणि भगवान महादेवाचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ज्यांना पायी चालणे शक्य नाही, अशा शिवभक्तांनीही १३ ऑगस्ट रोजी जळोद मार्गावर सकाळी १ ते २ या वेळेत कावड यात्रेतील शिवभक्तांना भेटून सहभागी व्हावे, असे आवाहन कावड यात्रेचे प्रमुख शिवभक्त सुभाष पाटील, भिकन वाडीले आणि सुशील भोईटे यांनी केले आहे. श्रावणातील या धार्मिक सोहळ्यामुळे अमळनेर शहरासह परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, हर हर महादेवच्या जयघोषात कावड यात्रेची तयारी सुरू झाली आहे.

Leave a Reply