रक्षाबंधनाला पोलिसांच्या मनगटावर मायेची राखी; फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपच्या महिलांचा उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) : नागरिकांच्या सुरक्षेसाठी वर्षभर दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बांधवांसोबत फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपच्या महिला सदस्यांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. पोलिस स्टेशनमध्ये पोलिस बांधवांचे औक्षण करून त्यांच्या मनगटावर राखी बांधत महिलांनी बहिणीची भूमिका निभावली. या उपक्रमातून पोलिस आणि समाजातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित झाले.

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार पोलिस बांधव नागरिकांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असतात. विविध सण-उत्सवांच्या काळात नागरिक आनंदाने उत्सव साजरा करत असताना पोलिस बांधव मात्र कर्तव्यावर तैनात राहून कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडतात. आपल्या कुटुंबापासून दूर राहून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या पोलिसांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून अमळनेर पोलिस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा उपक्रम आयोजित केला जात आहे. यावर्षीही ग्रुपच्या अध्यक्ष ॲड. ललिता पाटील यांच्यासह ग्रुप सदस्य वसुंधरा लांडगे, डॉ. प्रतिभा मराठे, सुचिता पाटील आणि लता पाटील यांनी पोलिस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलिस बांधवांचे औक्षण केले. त्यानंतर महिला सदस्यांनी पोलिस बांधवांच्या मनगटावर राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पोलिस बांधवांनीही महिला सदस्यांच्या या प्रेमळ उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बहिणींच्या मायेने आणि आपुलकीने पोलिस बांधव भारावून गेले. काही काळासाठी पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्याच्या वातावरणासोबतच भावनिक आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. पोलिस बांधवांच्या कार्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमातून समाज आणि पोलिस यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *