
सुरतला गेलेल्या कुटुंबाचे घर चोरट्यांनी फोडले; २९ हजारांचा ऐवज लंपास
अमळनेर (प्रतिनिधी) मुलाला नोकरी लागल्याने सुरत येथे राहायला गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराला चोरट्याने लक्ष्य करत २५ हजार रुपये रोख आणि चार हजार रुपये किमतीची चांदीची मूर्ती असा एकूण २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. बसस्थानकामागील ओम शांती नगर येथे ५ ऑगस्ट ते ५ ऑक्टोबरदरम्यान ही चोरी झाली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पुष्पा अरुण अधिकार यांचा मुलगा निलेश याला सुरत येथे नोकरी लागल्याने त्या ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजता घराला कुलूप लावून मुलासह सुरत येथे राहायला गेल्या होत्या. ४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने फोन करून घराचे कुलूप उघडे असल्याचे कळवले. त्यानंतर पुष्पा अधिकार या मुलासह ५ ऑक्टोबर रोजी पहाटे अमळनेर येथे परतल्या. घरी आल्यानंतर कपाटातील आणि पलंगाखालील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. घराची पाहणी केली असता २५ हजार रुपये रोख आणि चार हजार रुपये किमतीची चांदीची मूर्ती चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल सुनील तेली करीत आहेत.

Leave a Reply