
लाड पागे समितीच्या प्रलंबित नियुक्त्यांसाठी पालिकेसमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन
अमळनेर (प्रतिनिधी) लाड पागे समितीच्या शासनमान्य धोरणानुसार प्रलंबित असलेल्या वारसांच्या नियुक्ती प्रकरणांना तसेच इतर मागण्यांना विलंब होत असल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने १५ सप्टेंबरपासून अमळनेर नगरपरिषद कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुन्हा सुरू केले आहे.
संघटनेने यापूर्वी २० जुलै २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर याच मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्याधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पात्र उमेदवारांना एका महिन्याच्या आत नियुक्ती आदेश निर्गमित करण्याचे तसेच इतर मागण्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर संघटनेने २१ ऑगस्ट २०२६ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी स्मरणपत्रेही दिली होती. मात्र, आश्वासनाची मुदत उलटूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने तसेच सात दिवसांच्या आत नियुक्ती आदेश निर्गमित न झाल्याने १५ सप्टेंबरपासून आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आल्याचे संघटनेचे नाशिक विभाग अध्यक्ष अनिल सुभाष बेंडवाल व राज्याध्यक्ष नागेज मोहन कंडारे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. या आंदोलनाची माहिती आयुक्त तथा संचालक, मुंबई, जिल्हाधिकारी, जळगाव तसेच पोलीस निरीक्षक, अमळनेर यांनाही देण्यात आली आहे. लाड पागे समितीच्या प्रलंबित प्रकरणांवरील नियुक्त्यांसह इतर मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Leave a Reply