
धक्कादायक: पालिकेचा अजब कारभार! मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार
अंत्यसंस्काराच्या नावाखाली लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा वास!
अमळनेर: (विशेष प्रतिनिधी) नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी अंत्यसंस्काराच्या नावाखाली मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार सुरू केल्याचे समोर येत आहे. शहरातील नागरिकांच्या अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी मोफत ‘गौरी’ (शेणकुट) पुरविण्याचा निर्णय पालिकेने घेतला खरा, पण या निर्णयाच्या आड भ्रष्टाचाराचे मोठे ‘काळेबेरे’ शिजत आहे. विशेष म्हणजे, ज्या अंत्यसंस्कारासाठी अवघ्या काही शे रुपयांत ७ मन लाकूड मिळत होते, त्याच ठिकाणी आता चक्क ५,००० रुपयांचा अवाजवी ठराव मंजूर करून जनतेच्या कराच्या पैशांची उघडपणे लूट करण्याचा घाट घातला गेला आहे
नगरपालिकेकडून अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकडांचे सरण मोफत दिले जाते या सरणाची अधिकृत किंमत साधारण ३०० ते ५०० रुपये इतकी असायची, ज्यामध्ये ७ मण लाकूड उपलब्ध व्हायचे. मात्र, आता लाकडाऐवजी गौरी वापरण्याचा निर्णय घेताना पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी या एका अंत्यविधीच्या खर्चाचा आकडा थेट ५,००० रुपयांवर नेऊन ठेवला आहे. अवघ्या ५०० रुपयांत होणारा खर्च दहापट वाढवून ५,००० रुपये करण्यामागे नेमके कोणाचे आर्थिक हित दडले आहे? हा अवाजवी खर्च कोणाच्या खिशात जाणार? असे तीक्ष्ण सवाल आता उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे, स्थानिक गोशाळा ग्रामीण भागात हीच गौरीची सेवा अवघ्या ३,००० रुपयांत पूर्ण सोयीनिशी उपलब्ध करून देत आहे. जर खासगी संस्था किंवा गोशाळा नफा न कमवता ३,००० रुपयांत सेवा देऊ शकते, तर मग नगरपालिकेसारख्या मोठ्या यंत्रणेला शहरात ही सेवा २,००० ते २,५०० रुपयांत उपलब्ध करून देणे सहज शक्य होते. असे असतानाही, पालिकेने ५,००० रुपयांचा ठराव संमत करणे म्हणजे हा निव्वळ भ्रष्टाचार आणि ‘बजेट’ फुगवून ठेकेदारांचे खिसे भरण्याचा प्रकार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
नागरिकांना मदतीच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे जाळे विणले जात असेल, तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणती असू शकते? “माणसाच्या मृत्यूतही जर कमाईचे गणित मांडले जात असेल, तर ही व्यवस्था नेमकी कोणासाठी?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ३००-५०० रुपयांच्या खर्चाचा आकडा ५,००० वर नेणे ही केवळ तफावत नसून, ही जनतेच्या रक्ताघामाच्या पैशांची दिवसाढवळ्या केलेली लूट आहे. या अवाजवी दरवाढीच्या निर्णयामागे मोठा आर्थिक घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासगीतही गौरीद्वारे अंत्यसंस्कार करायचे म्हटले तरी अडीच-तीन हजारांच्या वर खर्च येत नाही. मग पालिकेचे ५,००० रुपये कोठे मुरणार आहेत? या ठरावामुळे पालिकेच्या तिजोरीवर विनाकारण मोठा बोजा पडणार असून, याचा फायदा केवळ मध्यस्थ आणि संबंधित ठेकेदारांनाच होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी आणि हा ‘मृतांच्या टाळूवरचे लोणी’ खाणारा ठराव तातडीने रद्द करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नगरपालिकेच्या या संतापजनक निर्णयामुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आगामी काळात नागरिक रस्त्यावर उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. जर प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर हा ‘गौरी घोटाळा’ पालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.
नगरपालिकेने सेवाभावी वृत्तीने काम करणे अपेक्षित
“अंत्यविधी ही काही व्यापार करण्याची जागा नाही. प्रशासनाने संवेदनशील राहून हे दर कमी करायला हवेत. गोशाळेचा आदर्श घेऊन नगरपालिकेने सेवाभावी वृत्तीने काम करणे अपेक्षित आहे.”
एक स्थानिक नागरिक


Leave a Reply