मिशन सुधार योजनेत अन्नसुरक्षेचे बोगस लाभार्थी आढळले; ३७ हजार संशयित रेशनकार्डांची यादी!

अमळनेर (प्रतिनिधी) शासनाच्या मिशन सुधार योजनेंतर्गत कठोर पावले उचलण्यात येत असून अन्नसुरक्षा योजनेतील बोगस लाभार्थी आढळून आले आहेत. अशा अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  लोकसंख्या आणि नागरिकांचा आर्थिक स्तर पाहता अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली असून त्या प्रमाणात शासनाकडून मोफत धान्य वाटप केले जात आहे. मात्र आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक खाते लिंकिंग प्रक्रियेमुळे आता प्रत्यक्ष स्थिती समोर येत असून शासनाने मिशन सुधार योजना राबवून बनावट लाभार्थी शोध मोहीम सुरू केली आहे. शासनाकडून लाभ घेऊन धान्याची लूट होत असल्याच्या तसेच खरे लाभार्थी वंचित राहत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनेक दिवस लाभ न घेतलेले रेशनकार्ड, दोन वेगवेगळ्या गावांमध्ये रेशनकार्ड असलेले नागरिक, आयकर भरणारे नागरिक, दोन एकरपेक्षा जास्त शेती असलेले नागरिक, संस्था किंवा कंपनीचे मालक अथवा संचालक, वाहनधारक, आधार संशयित, मयत लाभार्थी, १०० वर्षांवरील लाभार्थी तसेच १८ वर्षाखालील लाभार्थी आदी निकषांवर अमळनेर तालुक्यातील सुमारे ३७ हजार संशयित रेशनकार्डांची यादी प्राप्त झाली आहे. प्राधान्य कुटुंबासाठी ग्रामीण भागात ४४ हजार उत्पन्न मर्यादा तर शहरी भागासाठी ५९ हजार मर्यादा निश्चित आहे. मात्र विविध योजनांमधून मिळणाऱ्या रकमेची ऑनलाईन पडताळणी केल्यानंतर काही लाभार्थी अपात्र ठरत असल्याचेही समोर आले आहे.

 

आरसीएमएस प्रणालीद्वारे कारवाई होणार

 

संशयित लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांची नावे अन्न सुरक्षा लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार असून त्यांच्यावर आरसीएमएस प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. संशयित कार्डधारकांनी स्वतःहून खरी माहिती देऊन योजनेतून नावे कमी करून घेतल्यास त्यांना कारवाई न करता पांढरे रेशनकार्ड देण्यात येईल, अन्यथा शासनाकडून कारवाई करण्यात येईल.

रुकसाना शेख, पुरवठा निरीक्षण अधिकारी

 

नागरिकांनी स्वतःहून रेशनकार्ड जमा करून पांढरे कार्ड घ्यावे

 

शासनाने सर्व व्यवहार पारदर्शक केले असून मिशन सुधार योजनेंतर्गत प्रत्येकाचे उत्पन्न, आयकर व विविध योजनांमधून मिळणाऱ्या रकमेची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून रेशनकार्ड जमा करून पांढरे कार्ड घ्यावे, अन्यथा अपात्र ठरवून कारवाई करण्यात येईल,

रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार अमळनेर 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *