
संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ५३ युनिट रक्तसंकलन
मोटारसायकल रॅलीद्वारे जनजागृती; मानवसेवेचा संदेश अधिक दृढ

अमळनेर (प्रतिनिधी) युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह यांच्या स्मृतीनिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सेवा उपक्रमांच्या प्रारंभाचा भाग म्हणून संत निरंकारी मिशनच्या वतीने अमळनेर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ५३ युनिट रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी यापूर्वी शहरात मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशभरात सुमारे ७०५ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. करुणा, मानवता आणि एकात्मतेची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. विशेष म्हणजे, संत निरंकारी मिशनची रक्तदानाची ही परंपरा गेल्या चार दशकांपासून अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत ९ हजार १७४ रक्तदान शिबिरांद्वारे सुमारे १५ लाख २३० युनिट रक्त संकलित करण्यात आले असून मानवसेवेप्रती मिशनची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. अमळनेर येथे १३ जून रोजी मोटारसायकल रॅली काढून रक्तदानाबाबत जनजागृती करण्यात आली. त्यानंतर १४ जून रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत चोपडा रोडवरील सिंधी कॉलनी येथील संत निरंकारी सत्संग भवनात रक्तदान शिबिर पार पडले.
या शिबिरासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तकेंद्र विभागातील अनुभवी डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदात्यांची आवश्यक आरोग्य तपासणी करून सुरक्षित व सुव्यवस्थित पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली.
युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह यांनी सत्य, साधेपणा आणि सद्भावनेचा मार्ग दाखवत तरुणांना नशामुक्त जीवन जगण्याचे आणि आपली ऊर्जा समाजसेवेसाठी वापरण्याचे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे बाबा हरदेव सिंह यांनी “रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे” हा संदेश देत सेवेला जीवनाचा अविभाज्य भाग बनवले. सतगुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवा संदेश आजही प्रभावीपणे पुढे नेला जात आहे.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन धुळे झोन क्रमांक ३६-बी चे झोनल इंचार्ज हिरालाल पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी अमळनेर शाखेचे प्रमुख श्रीचंद निरंकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रक्तदात्यांना दिला अल्पोपहार
रक्तदात्यांना अल्पोपहार, चहा, बिस्किटे, फळे तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर शाखेचे सेवादल इंचार्ज जितेंद्र डिंगराई, महिला इंचार्ज प्रीती बटेजा तसेच सेवादल सदस्य आणि संगतीतील भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
या उपक्रमामुळे रक्तदानाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून समाजसेवा आणि मानवतेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचला आहे.

Leave a Reply