
पालिकेच्या कथित अतांत्रिक कामाचा फटका, ९८ लाखांचा ट्रिमिक्स रस्ता पावसात ‘तलाव’
अमळनेर (प्रतिनिधी) शहराच्या मुख्य बाजारपेठेचे रूप बदलण्यासाठी जवळपास ९८ लाख ३६ हजार रुपयांहून अधिक निधी खर्च करून उभारण्यात आलेला ट्रिमिक्स रस्ता पहिल्याच पावसात जलसाठ्याचे केंद्र ठरल्याचा आरोप नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाल्याने दुकाने धोक्यात आली असून ग्राहक, पादचारी आणि वाहनचालकांना अक्षरशः पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. एवढा मोठा खर्च करूनही पावसाच्या पाण्याचा निचरा न होणे, रस्त्याला आवश्यक उतार न देणे आणि अंदाजपत्रकातील पेव्हर ब्लॉकऐवजी अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण केल्याचा आरोप होत असल्याने नगरपरिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अमळनेर नगरपरिषदेने शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शहरातील मुख्य बाजारपेठेतील डॉ. अंजली चव्हाण यांच्या दवाखान्यापासून ते दुर्गा टी डेपोपर्यंत ट्रिमिक्स रस्ता, दुभाजक आणि फुटपाथ बांधण्यासाठी तब्बल ९८ लाख ३६ हजार ३१५ रुपये खर्च केले. मात्र, पावसाळा सुरू होताच या रस्त्यावरील कामातील कथित अतांत्रिक दोष उघड झाल्याचा आरोप व्यापारी आणि नागरिकांनी केला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याने बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहारांवर त्याचा परिणाम होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक दुकानांसमोर पाणी साचत असल्याने ते थेट दुकानांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचण्यासाठी पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.
या रस्त्यालगत असलेल्या आयडीबीआय बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरही मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने बँकेत येणाऱ्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग तसेच लहान मुलांसह येणाऱ्या नागरिकांना पाण्यातून चालत बँकेत प्रवेश करावा लागत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रस्ता बांधताना पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल, अशा प्रकारचा आवश्यक उतार (स्लोप) देण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरच साचून राहत आहे. एवढ्या मोठ्या निधीतून काम करूनही तांत्रिक नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याने नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याशिवाय या कामाच्या मंजूर अंदाजपत्रकात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पेव्हर ब्लॉक बसविण्याची स्पष्ट तरतूद असतानाही अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंनी पूर्णतः काँक्रिटीकरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाला असून जलसाठ्याची समस्या अधिक गंभीर झाल्याचे जाणकारांचे मत आहे. विशेष म्हणजे काही खाजगी रहिवासी व दुकानांसमोरील मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले असून, उर्वरित भागात अंदाजपत्रकानुसार काम झाले नसल्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नागरिकांनी या संपूर्ण कामाची तांत्रिक चौकशी करून दोषी अधिकारी, अभियंते आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, तसेच रस्त्यावरील पाणी साचण्याची समस्या तातडीने दूर करून आवश्यक त्या ठिकाणी योग्य उतार देणे, पावसाच्या पाण्याचा प्रभावी निचरा करणे आणि अंदाजपत्रकानुसार त्रुटीपूर्ण कामाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
ठेकेदाराकडून कामाची दुरुस्ती करून घेऊ
“पालिकेच्या बांधकाम शहर अभियंताकडून पाहणी करून सदर रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात येतील. तसेच ठेकेदाराकडून अंदाजपत्रकानुसार कामाची दुरुस्ती करून घेण्यात येईल.”
-गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद
पाणी साचण्याची समस्या तातडीने सोडवावी
“सदर रस्त्याचे काम करत असताना पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल. असा उतार (स्लोप) न देण्यात आल्यामुळे आता रस्त्यावर पाणी साचत आहे. तसेच दोन्ही बाजूंनी पूर्णतः काँक्रीटीकरण केल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचा मार्ग बंद झाला आहे. तरी पालिका प्रशासनाने रस्त्यावरील पाणी साचण्याची समस्या तातडीने सोडवावी.”
– शकील शेख, व्यापारी, अमळनेर

Leave a Reply