
मंगळग्रह मंदिरात आजपासून महारुद्राचा जयघोष; ११ लघुरुद्र, १३३१ आवर्तने
अमळनेर (प्रतिनिधी) : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात श्रावण मासाची समाप्ती व संकल्पपूर्तीनिमित्त बुधवार, दि. ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान भव्य महारुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी आशाताई महाले यांच्या शुभहस्ते या विशेष धार्मिक सोहळ्यातील परमपवित्र अनुष्ठान होणार आहे.
सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत दोन सत्रांत महारुद्र पूजा होणार असून, प्रधान आचार्य वे. मू. केशव पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली पूजेचे पौरोहित्य केले जाणार आहे. या निमित्ताने तीन दिवस मंदिर परिसरात भक्तीमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे. श्री मंगळग्रह मंदिरातील मुख्य स्वयंभू अतिजागृत मूर्तीवर ११ लघुरुद्रांचे अनुष्ठान करण्यात येणार असून, त्यामध्ये १३३१ रुद्र आवर्तने केली जाणार आहेत. मंगळदेवांचा महाभिषेक सुमारे दोन दिवस चालणार आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी, मंदिरातील ऊर्जा वाढावी तसेच येणाऱ्या काळात वाढलेल्या हिंसाचारावर अंकुश यावा, यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. महारुद्र पूजेच्या तिसऱ्या दिवशी श्री मंगळदेव व मंदिरातील संपूर्ण परिवार देवतांचे हवन, बलिदान व पूर्णाहुती विधीवत करण्यात येऊन या धार्मिक अनुष्ठानाची सांगता होणार आहे.
मनःशांती आणि सकारात्मकतेसाठी महारुद्राचे अनुष्ठान
धार्मिक श्रद्धेनुसार महारुद्र पूजेच्या माध्यमातून मनःशांती, आरोग्य, सुख-समृद्धी, कौटुंबिक सौख्य आणि जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी श्री मंगळदेवांची कृपा प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संकटसमयी मानसिक बळ मिळावे, नकारात्मक विचार दूर व्हावेत आणि जीवनात सकारात्मकता व सात्त्विक विचारांची वृद्धी व्हावी, या हेतूने अनेक भाविक रुद्राभिषेक व महारुद्र पूजेचे अनुष्ठान करतात. श्री मंगळदेव हे शिवपुत्र असल्याने या महारुद्र पूजेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. आत्मशुद्धी, मनाची एकाग्रता, अहंकाराचा क्षय आणि ईश्वराशी असलेले नाते अधिक दृढ होणे, असा महारुद्र पूजेचा व्यापक आध्यात्मिक अर्थ मानला जातो.
तीन दिवस भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी
महारुद्र पूजेदरम्यान तीन दिवसांत ११ लघुरुद्र अभिषेक पूजन तसेच १ लघुरुद्र हवन विधीवत होणार आहे. यासोबत विविध धार्मिक विधी, मंत्रपठण आणि अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हर हर महादेव’, ‘मंगलदानी की जय हो’, ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने तीन दिवस श्री मंगळग्रह मंदिर परिसर मंगलभक्तीच्या चैतन्याने भारावून जाणार आहे. या आध्यात्मिक पर्वात सहभागी होऊन श्री मंगळदेवांचे दर्शन व महारुद्र पूजेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.

Leave a Reply