
अमळनेरच्या डॉ. विवेक बोरसे यांचा विश्लेषणात्मक रसायनशास्त्रातील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरचे सुपुत्र डॉ. विवेक बोरसे यांनी जागतिक वैज्ञानिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपल्या संशोधनाचा ठसा उमटवला आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि एल्सेव्हियर यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर करण्यात आलेल्या जगातील अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत त्यांचा २०२५ आणि २०२६ या सलग दुसऱ्या वर्षी समावेश झाला आहे. विश्लेषणात्मक रसायनशास्त्रातील संशोधनाची दखल घेत त्यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. डॉ. बोरसे हे अमळनेर येथील भारत संचार निगम लिमिटेडचे निवृत्त अधीक्षक भास्कर बोरसे यांचे सुपुत्र आहेत.
डॉ. विवेक बोरसे यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. विश्लेषणात्मक रसायनशास्त्र आणि वैद्यकीय तंत्रज्ञान या क्षेत्रांत त्यांनी संशोधन केले असून, शैक्षणिक संशोधनासोबतच वैद्यकीय उपकरण निर्मिती उद्योगातही त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा विकास, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची रचना आणि प्रयोगशाळेतील संशोधनाचा औद्योगिक स्तरावर वापर या क्षेत्रांत त्यांनी योगदान दिले आहे. सध्या त्यांच्या संस्थात्मक संलग्नतेची नोंद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, हैदराबाद अशी आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि एल्सेव्हियर यांच्या वतीने शास्त्रज्ञांचे संशोधन, शोधनिबंध आणि त्यांचा जागतिक प्रभाव यांसारख्या वैज्ञानिक निकषांच्या आधारे ही यादी तयार केली जाते. या यादीत सलग दोन वर्षे स्थान मिळवणे ही डॉ. बोरसे यांच्या संशोधन कार्यातील महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे. “संशोधनातील प्रगती ही केवळ एका व्यक्तीची नसून सामूहिक प्रयत्न, सहकार्य आणि विचारांची देवाणघेवाण यांतून घडत असते. या टप्प्यापर्यंत पोहोचण्यात मार्गदर्शन करणारे माझे सर्व गुरुजन, सहकारी संशोधक आणि सहकाऱ्यांचा वाटा मोलाचा आहे,” अशी भावना डॉ. विवेक बोरसे यांनी व्यक्त केली. यापुढेही वैज्ञानिक संशोधनाला गती देणे, नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि सामान्य नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळेल अशा आरोग्यविषयक तंत्रज्ञानावर भर देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशामुळे अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठीही त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply