
कन्हेरे येथे भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियानाचा जनजागर; शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला सेंद्रिय शेतीचा संदेश
अमळनेर (प्रतिनिधी) अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियानाच्या जनजागर रथाचे बुधवारी, दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ८.१५ वाजता अमळनेर तालुक्यातील कन्हेरे येथे आगमन झाले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने चिंचदेवी मंदिराच्या सभामंडपात आयोजित कार्यक्रमात भूमीमातेचे विधिवत पूजन करून शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य अतिथी तथा लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत अरुण नेरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कन्हेरे गाव व मंडळ परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती आणून भक्तीमय वातावरणात तिचे पूजन केले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये मातीबद्दल जागरूकता आणि सेंद्रिय शेतीविषयी उत्साह निर्माण झाला.
कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी राजेश प्रकाश बोरसे, उपकृषी अधिकारी दिनेश पाटील, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, अकाउंट मॅनेजर मनोहर तायडे यांच्यासह श्री मंगळग्रह मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, गणेश जोशी तसेच सेवेकरी राजेंद्र पाटील, उज्ज्वल अहिरराव, दीपक पाटील, शुभम शिसोदे आणि अक्षय पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुबोध पाटील यांनी मान्यवरांचा श्री मंगळग्रह देवाची प्रतिमा भेट देऊन सन्मान केला. त्यांनी भूमी सुपोषण चळवळीची पार्श्वभूमी सविस्तरपणे स्पष्ट केली. त्यानंतर विविध गावांतून संकलित करण्यात आलेल्या मातीचे मंदिराच्या पुरोहितांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे शेती व पर्यावरणावर होत असलेल्या दुष्परिणामांबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण पाटील यांनी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा, रायझोबियम, बीज प्रक्रिया आदी तंत्रज्ञानाची माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना अभियानाची माहिती देणाऱ्या पत्रकांचे वितरण करण्यात आले तसेच जैविक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.
जनजागर रथाने या गावांना दिली भेट
भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियानाच्या जनजागर रथाने कन्हेरेसह फापोरे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, सडावण बुद्रुक आणि कोळपिंप्री या गावांना भेट दिली. ध्वनिक्षेपकाद्वारे अभियानाची माहिती देत सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देण्यात आले. ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करून त्यांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply