
दहीवदजवळ भरधाव दुचाकीची एसटी बसला धडक; दुचाकीस्वार जखमी
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील दहीवद गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना ६ जुलै रोजी रात्री घडली. या प्रकरणी बसचालकाच्या फिर्यादीवरून संबंधित दुचाकी चालकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, एसटी बसचालक विजय पाटील हे ६ जुलै रोजी सायंकाळी जळगाव येथून एसटी बस घेऊन गांधली येथे मुक्कामासाठी निघाले होते. रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास बस दहीवद येथील आश्रमशाळेजवळ पोहोचली. यावेळी बस रस्त्याच्या डाव्या बाजूने संतुलित वेगाने जात असताना मागून भरधाव आलेल्या हिरो एचएफ डिलक्स (क्रमांक एमएच १८ बीएस ४७१८) या दुचाकीने बसच्या मागील बाजूस टायरजवळ जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला जाऊन जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याने मोबाईलद्वारे संपर्क साधल्यानंतर काही वेळातच एक चारचाकी वाहन घटनास्थळी आले आणि त्याला उपचारासाठी घेऊन गेले.
या अपघातात एसटी बसचे किरकोळ नुकसान झाले असून बसमधील प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर बसचालक विजय पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून संबंधित दुचाकी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.

Leave a Reply