
चिमणपुरी-पिंपळे खुर्दच्या गायत्री पाटीलची राज्यस्तरीय बाल संसदेत मंत्रीपदी निवड
महाराष्ट्राच्या बाल महिला व बालविकास मंत्रिपदाची जबाबदारी
अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी नेतृत्वाची संधी मिळताच थेट राज्यस्तरावर आपली छाप उमटवली आहे. चिमणपुरी-पिंपळे खुर्द येथील गायत्री विनोद पाटील हिची पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय बाल संसदेत महाराष्ट्राच्या ‘बाल महिला व बालविकास मंत्री’पदी निवड झाली आहे. बालिका स्नेही पंचायतीच्या माध्यमातून दोन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना मिळालेल्या या यशामुळे अमळनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, यशदा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बालदिनानिमित्त पुणे येथे राज्यस्तरीय बाल संसदेचे आयोजन करण्यात आले होते. बालकांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग वाढविणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि स्वतःच्या समस्या, अपेक्षा व हक्क मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या उपक्रमात महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील १०२ गावांतील बालकांनी सहभाग घेतला. राज्यातील सहा विभागांतून निवड झालेल्या २२ बालप्रतिनिधींना राज्यस्तरीय बाल संसदेत सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यातून बाल मुख्यमंत्री, बाल विधानसभा अध्यक्ष, बाल विरोधी पक्षनेता आणि विविध खात्यांचे बालमंत्री निवडण्यात आले. प्रत्यक्ष संसदीय कामकाजाच्या धर्तीवर झालेल्या या बाल संसदेत गायत्री विनोद पाटील हिच्यावर महिला व बालविकास मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
दोन वर्षांच्या प्रयत्नांना राज्यस्तरावर यशाची पावती!
ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी-पिंपळे खुर्दच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील यांच्या पुढाकारातून गेल्या दोन वर्षांपासून बालिका स्नेही पंचायतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थिनींना सातत्याने मार्गदर्शन करून त्यांच्यात नेतृत्वगुण, वक्तृत्व, संवादकौशल्य आणि सामाजिक प्रश्नांची जाणीव निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बालिका स्नेही पंचायतीने जिल्हास्तरावरही पुरस्कार मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यानंतर नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्यातील तीन गावांची राज्यस्तरीय बाल संसदेसाठी निवड झाली. त्यात चिमणपुरी-पिंपळे खुर्दचाही समावेश होता.
राज्यस्तरीय बाल संसदेत या गावातील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट संभाषण, आत्मविश्वासपूर्ण मांडणी आणि गावात बालिका स्नेही पंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची प्रभावी माहिती सादर केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.
बालप्रतिनिधींनी मांडले शिक्षण, आरोग्य आणि बालसुरक्षेचे प्रश्न!
बाल संसदेत शिक्षण, आरोग्य, पाणी, स्वच्छता, पोषण आणि बालसुरक्षा या महत्त्वाच्या विषयांवर बालप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले. बालकांना केवळ प्रेक्षक न ठेवता प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून बालप्रतिनिधींचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. गावातील मुलींना केवळ शिक्षणच नव्हे, तर नेतृत्वाची संधी, निर्णयक्षमता आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविण्याचे व्यासपीठ दिल्यास त्या राज्यस्तरावरही आपली क्षमता सिद्ध करू शकतात, हे चिमणपुरी-पिंपळे खुर्दच्या बालिका स्नेही पंचायतीच्या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे. सरपंच वर्षा युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमाचे तालुकाभरातून कौतुक होत असून गायत्री विनोद पाटील हिच्या निवडीमुळे गावाच्या नावलौकिकात भर पडली आहे.

Leave a Reply