नाकाबंदीत अमळनेर पोलिसांचा दणका; १५४ वाहनचालकांवर कारवाई, २ लाखांचा दंड

अमळनेर (प्रतिनिधी) : शहरात १७ ते २० ऑगस्टदरम्यान नाकाबंदी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात अमळनेर पोलिसांनी मोटार वाहन कायद्यानुसार धडक कारवाई केली. चार दिवसांत विविध प्रकारच्या वाहतूक नियमभंगाच्या एकूण १५४ केसेस दाखल करण्यात आल्या असून, त्यातून २ लाख १ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाकाबंदी दरम्यान विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या ९ जणांवर, अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या ४ जणांवर तसेच बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या ४१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच कलम ६६/१९२ अंतर्गत ३ जणांवर कारवाई करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १ वाहनचालकावर, तर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ३७ जणांवर कारवाई करण्यात आली.

मॉडिफाय सायलेन्सर वापरणाऱ्या १ वाहनचालकावर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या १५ जणांवर तसेच रिफ्लेक्टर नसलेल्या ७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शाळा व महाविद्यालय परिसरातील वाहतूक नियमभंगाच्या ८ केसेस, तर इतर मोटार वाहन कायद्यानुसार ३० केसेस दाखल करण्यात आल्या.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे तसेच अपघातांना आळा घालण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, असे आवाहन अमळनेर पोलिसांनी केले आहे. ही कारवाई पो.ह.कॉ. १६६६ संजय बोरसे, पो.हे.कॉ. ६३० विनय पाटील, पो.कॉ. ६१७ रवींद्र बोरसे आणि पो.कॉ. १६१० संजय सोनवणे यांनी केली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *