
महाराष्ट्राची लोकधारा’चा सजीव देखावा ठरणार यंदाच्या गणेशोत्सवाचे आकर्षण
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मंडळाची सन २०२६-२७ ची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंडळाची सभा सभापती अशोक आधार पाटील व मंडळाचे अध्यक्ष गौरव धनंजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अमरदीप वसंत अमृतकर यांची मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी महावीर विमलचंद बाफना व हितेश शंकरलाल बितराई, सेक्रेटरीपदी प्रकाश काशिनाथ अमृतकर, सहसेक्रेटरीपदी ध्रुव ऋषभ पारख, तर खजिनदारपदी सचिन सुधाकर पाटील यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणीच्या सदस्यपदी गौरव पाटील, कपिल दलाल, कुशल राणे, पंकज झवर, अमोल मराठे, दिघेश जाधव, फलेश बोथरा, अथर्व डेरे, कार्तिक चौधरी, कुणाल चौधरी, हर्षल पाटील, सागर गोसलीया, विपुल चव्हाण, अमोल नेरकर, बबन पाटील व सागर वाणी यांची नियुक्ती करण्यात आली.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मंडळाची परंपरा जुनी असून, १९८४ पासून मंडळाकडून गणेशभक्तांसाठी आकर्षक सजीव देखावे सादर केले जात आहेत. धार्मिक व पौराणिक प्रसंगांसह विविध तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांवर आधारित देखाव्यांच्या माध्यमातून मंडळाने गणेशोत्सवात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाही गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणारा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा सजीव देखावा सादर करण्याचे मंडळाने नियोजन केले आहे. महाराष्ट्राची संस्कृती, लोककला, परंपरा आणि विविध लोकधारांची समृद्ध झलक या देखाव्यातून गणेशभक्तांना अनुभवता येणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “आपला महाराष्ट्र, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची कला छोट्याशा प्रयत्नातून का होईना, गणेशभक्तांसमोर सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
सुमारे ३० मिनिटांचा हा सजीव देखावा असल्याने गणेशभक्तांची गर्दी आणि वेळेचे नियोजन सुरळीत व्हावे यासाठी शोच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. रात्री ७.००, ७.३०, ८.००, ८.३०, ९.००, ९.३०, १०.००, १०.३०, ११.००, ११.३० आणि १२.०० वाजता ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा सजीव देखावा सादर केला जाणार आहे..गणेशभक्तांनी निश्चित केलेल्या वेळेनुसारच शोसाठी रांगेत यावे, गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंडळाला सहकार्य करावे आणि महाराष्ट्राच्या संस्कृती व लोककलेचे दर्शन घडविणाऱ्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या अनोख्या सजीव देखाव्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply