
सात वाहनांत २० गुरांची निर्दयी वाहतूक; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त, वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) सात वाहनांमध्ये २० गुरे दाटीवाटीने कोंबून, कोणताही परवाना नसताना निर्दयीपणे वाहतूक केली जात असल्याचा प्रकार २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास रेल्वे उड्डाणपुलाखाली उघडकीस आला.
गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही वाहने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी सात वाहनांसह २० गुरे असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सात वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गोरक्षक अभय महाजन, जयेश चौधरी, विजय पाटील आणि सचिन महाजन यांनी २३ रोजी दुपारी रेल्वे उड्डाणपुलाखाली काही वाहने अडवली. वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये गुरे दाटीवाटीने कोंबून भरल्याचे आढळले. याबाबत त्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना माहिती दिली. त्यानंतर सिद्धांत शिसोदे, हेडकॉन्स्टेबल विनय पाटील आणि संजय बोरसे यांना कारवाईसाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी वाहनचालकांची चौकशी केली असता रोहित प्रमोद पाटील (वय २०, रा. भवरखेडा) याच्या एमएच १९ सीएक्स २५४४ क्रमांकाच्या वाहनात दोन बैल, मयूर संजय पाटील (वय २९, रा. पळासखेडे, ता. भडगाव) याच्या एमएच १९ सीवाय ६६९४ क्रमांकाच्या वाहनात तीन बैल, शरद बाळू पाटील (वय ४४, रा. महिंदळे, ता. भडगाव) याच्या एमएच ४८ एवाय २५१२ क्रमांकाच्या वाहनात तीन बैल, प्रदीप सुभाष धनगर (वय ३२, रा. धरणगाव) याच्या एमएच १९ सीवाय २२६९ क्रमांकाच्या वाहनात तीन बैल आढळले. तसेच चंदू कैलास पाटील (रा. बोरगाव, ता. धरणगाव) याच्या एमएच ०४ जीआर ८०३७ क्रमांकाच्या वाहनात तीन बैल, समाधान विठ्ठल माळी (रा. धरणगाव) याच्या एमएच १२ क्यूजी ८८०५ क्रमांकाच्या वाहनात गुरे, तर सचिन विश्वासराव चव्हाण (वय ४१, रा. भाटिया गल्ली, धरणगाव) याच्या एमएच १९ बीएन ५८०३ क्रमांकाच्या वाहनात तीन गुरे दाटीवाटीने भरलेली आढळली. वाहनचालकांकडे गुरे खरेदी केल्याचा अथवा त्यांच्या वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. गुरे कोठून आणली आणि कोठे घेऊन जात आहेत, याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून गुरांची तपासणी केली. गुरांना पालनपोषणासाठी गोशाळेत रवाना करण्यात आले, तर सातही वाहने पोलीस ठाण्यात जमा करून संशयित वाहनचालकांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात सात वाहनचालकांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा कलम ११(१)(ड)(ई)(फ)(क), भारतीय न्यायसंहिता कलम ३(५) आणि मुंबई पोलीस कायदा कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.
.

Leave a Reply