पिशोरहून चिखलठाणकडे संत सखाराम महाराजांची पायी वारी झाली मार्गस्थ

अमळनेर (प्रतिनिधी) संत सखाराम महाराजांच्या आषाढी पायी वारीचा प्रवास गुरुवारी (दि. ९) नियोजित वेळेनुसार पिशोर येथून चिखलठाणकडे भक्तिमय वातावरणात सुरू झाला. सकाळपासूनच वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. दुपारी ११ वाजता दिंडीने पिशोर येथून प्रस्थान केले. यावेळी ३५० वारकऱ्यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

पिशोरहून निघालेली दिंडी भारंबा टांडा, जैतखेडा आणि वडाळी मार्गे सुमारे २३ किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत चिखलठाण येथे मुक्कामी पोहोचणार आहे. संपूर्ण मार्गावर हरिनामाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठल नामस्मरणाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यंदाच्या दिंडीत सुमारे ३५० वारकरी सहभागी झाले असून, “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “श्री संत सखाराम महाराज की जय” या जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेले आहे. वारकरी भक्तिभावाने विठ्ठलाचे नामस्मरण करत शिस्तबद्ध पद्धतीने पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. वारी मार्गावरील गावांमध्ये वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत असून, विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि सेवाभावी मंडळांकडून पिण्याच्या पाण्याची, अल्पोपहाराची तसेच वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. संत सखाराम महाराज संस्थानच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पालखी सोहळ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात येत असून, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसह सर्व आवश्यक सुविधांवर विशेष लक्ष दिले जात आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ मनात ठेवून वारकरी आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. संत सखाराम महाराजांच्या नामगजराने आणि हरिनामाच्या अखंड ध्यासाने संपूर्ण वारी सोहळा भक्तिमय वातावरणात पुढे सरकत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *