
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ रद्द किंवा स्थगित करण्याची मागणी; प्रा. अशोक पवार यांचे सरकारला आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी )देशातील आर्थिक परिस्थिती, इंधन बचत आणि काटकसरीची गरज लक्षात घेता २०२७ मध्ये होणारा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा रद्द किंवा स्थगित करण्यात यावा, अशी मागणी प्रा. अशोक पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्य सरकार व केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.
प्रा. पवार यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर व संसाधनांचा संयमित वापर करण्याचे आवाहन केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील साधेपणाचा संदेश देत मोटरसायकलने मंत्रालयात जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही मोठ्या खर्चाच्या कार्यक्रमांबाबत गंभीर विचार करण्याची आवश्यकता आहे.
त्यांच्या मते, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे वाहनांनी येणार असल्याने पेट्रोल व डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर होईल. त्यामुळे इंधन आयात वाढून देशाच्या अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त भार पडू शकतो. अशा परिस्थितीत कुंभमेळा रद्द किंवा स्थगित करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
प्रा. पवार यांनी पुढे म्हटले आहे की, कुंभमेळ्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. एका आखाड्यासाठीच ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात असून, अशा अनेक आखाड्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच भाविकांच्या प्रवासावरही मोठ्या प्रमाणावर खर्च होणार आहे.
हा खर्च टाळून शिल्लक निधी गरिबांच्या आरोग्य सुविधा, शेतकरी मदत आणि जनकल्याणाच्या योजनांवर खर्च करता येईल. तसेच या निर्णयातून देशभरात काटकसरीचा संदेश जाईल आणि इतर राज्यांसमोर महाराष्ट्राचा आदर्श निर्माण होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देश संकटात असताना साधुसंतांनीही समाजहिताचा विचार करून सिंहस्थ कुंभमेळा रद्द किंवा स्थगित करण्याबाबत पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही प्रा. अशोक पवार यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply