
उसनवार दिलेले पैशांवरून चौघांनी एकाला धारदार शस्रने व लोखंडी रॉडने केली मारहाण
अमळनेर (प्रतिनिधी) उसनवार दिलेले पाच हजार रुपये व्याजासह परत देत नाही म्हणून चौघांनी एकाला धारदार शस्रने व लोखंडी रॉडने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला असून ही घटना १५ रोजी रात्री ८ वाजता भीमनगर ताडेपुरा येथे घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रोहित भरत फतरोड (रा. फकिरवाडा ताडेपुरा) याने विकी सपकाळे यांच्याकडून १५ दिवसांपूर्वी ५ हजार रुपये उसनवार घेतले होते. ते ५ हजार रुपये मागण्यावरून विक्की त्याच्याशी भांडत होता. १५ रोजी वरणेश्वर महादेव मंदिरावर कुस्त्यांचा कार्यक्रम होता. तो पाहण्यासाठी रोहित गेला असता तेथे विक्की याने ५ हजार रुपयांचे व्याज दिले नाही म्हणून मागणी सुरू केली. तेव्हा रोहितने व्याजाबाबत काहीच बोलणे झाले नव्हते, असे सांगितले असता त्याने घरी येऊन व्याज वसूल करेल म्हणून सांगून निघून गेला आणि रात्री आठ वाजता विकी, राज जीभाऊ वाघ, गुड्ड्या रमेश वाघ , अनिल अरुण वाघ यांना घेऊन आला आणि रोहितला लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. विकीने त्याच्या हातातील धारदार शस्रने कपाळावर मारल्याने रोहितच्या कपाळातून रक्त येऊ लागले. राज वाघ याने हातातील लोखंडी रॉडने पायाच्या टाचेवर मारले. गुडड्याने लोखंडी सळईने मारहाण केली तर अनिल वाघ याने खाली पडून हातातील काठीने मारहाण केली. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी आवरले तेव्हा ते परत धमकी देऊन गेले की व्याज दिले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही. रोहितला उपचारसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांनतर पुढील उपचारसाठी धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. अमळनेर पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) ,११७(२) , ११५(२),३५२, ३५१(२) ,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

Leave a Reply