
पिंपळे येथे शॉर्ट सर्किटमुळे शेतात आग लागून गहू आणि उत्पन्नावर ठिबक साहित्य जळून खाक
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे येथे शॉर्ट सर्किटमुळे गव्हाच्या शेताला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना १५ रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या आगीत शेतकरी भीमराव नारायण पाटील यांच्या शेतातील उत्पन्नावर आलेला गहू तसेच ठिबक सिंचनाच्या नळ्या आणि इतर साहित्य जळून खाक झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळे येथील भीमराव नारायण पाटील यांच्या शेतात वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर (डीपी) आहे. दुपारच्या सुमारास ट्रान्सफॉर्मरमध्ये पक्षी घुसल्याने शॉर्ट सर्किट झाले. त्यातून उडालेल्या ठिणग्या शेजारील उभ्या गव्हाच्या पिकावर पडल्याने अचानक आग लागली. सुरुवातीला लहान असलेली आग वाऱ्यामुळे काही वेळातच शेतभर पसरू लागली.
आग लागल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालिकेकडून प्रथम पोलिसांत तक्रार नोंदविण्याचे सांगण्यात आल्याने अग्निशमन बंब पोहोचण्यास उशीर झाला. तोपर्यंत शेतातील आग अधिक भडकत होती. दरम्यान, गावातील शेतकरी आणि तरुणांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःच आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. श्याम पाटील, भीमराव पाटील, सुनील पाटील, नारायण पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी आजूबाजूच्या शेतातील ओल्या मक्याचे व बाजरीचे तोटे घेऊन आगीवर झोडपून ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बराच वेळ झुंज दिल्यानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
यानंतर दिनेश पाटील यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी कर्मचारी गणेश गोसावी यांना पाठवून अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना केला. काही वेळाने अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.
अग्निशमन दलाचे कर्मचारी आकाश बाविस्कर आणि फारूख शेख यांनी शेतातील उरलेल्या ठिणग्या व तापमान कमी करण्यासाठी शेतावर पाणी मारून परिसर पूर्णपणे ओला केला. त्यामुळे आग पुन्हा भडकण्याचा धोका टळला. या आगीत गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ठिबक सिंचनाच्या नळ्यांसह शेतीतील इतर साहित्यही जळून खाक झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी भीमराव पाटील यांनी शासनाकडून पंचनामा करून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply