तहसील कार्यालयातून मोटरसायकल चोरणारा कळमसरेचा युवक जेरबंद

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तहसील कार्यालयाच्या परिसरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या कळमसरे येथील एका युवकाला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून आणखी काही मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने कळमसरे येथील राहुल परशुराम कोळी (वय २२) याला अटक केली. यापूर्वी चोपडा तालुक्यातील वडोदा येथील एका संशयित चोरट्याला दोन मोटरसायकलींसह ताब्यात घेतल्यानंतर सुरू असलेल्या तपासादरम्यान राहुल परशुराम कोळी याचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. १० ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान गणेश कॉलनी येथील प्रदीप संतोष पाटील (वय ४४) यांनी आपली मोटरसायकल क्रमांक एमएच १९ सीएस ८५०५ तहसील कार्यालय परिसरात हँडल लॉक करून उभी केली होती. मात्र, काही वेळानंतर ती अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे राहुल परशुराम कोळी याचा शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडून आणखी काही चोरीच्या मोटरसायकली जप्त होण्याची शक्यता असून पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *