
पायल हॉटेलच्या गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेतील पायल हॉटेलच्या गोदामाला सोमवारी सकाळी अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत मोठ्या प्रमाणावर माल जळून खाक झाला. मात्र, अग्निशमन दल वेळेत घटनास्थळी दाखल झाल्याने आजूबाजूची दुकाने व गोदामे आगीच्या विळख्यात सापडण्यापासून वाचली आणि मोठा अनर्थ टळला.
नगरसेवक भरत शेठ ललवाणी यांच्या पायल हॉटेलच्या गोदामाला आग लागल्याचे सर्वप्रथम सिंधी समाजाचे गुरु महाराज यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ व्यवस्थापक व मालक भरत शेठ ललवाणी यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच नगरपरिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांच्यासह दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव आणि वसीम पठाण यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे परिसरातील इतर दुकाने व गोदामांचे संभाव्य नुकसान टळले. प्राथमिक माहितीनुसार, आगीत सुमारे ३ हजार प्लास्टिकच्या बाटल्या तसेच त्यामधील मद्यसाठा जळून खाक झाला असून अंदाजे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply