अमळनेर-वाळकी मुक्कामी बस सेवा सुरू; विद्यार्थी, प्रवाशांची मागणी पूर्ण

अमळनेर (प्रतिनिधी) विद्यार्थी व प्रवाशांच्या मागणीनुसार अमळनेर आगाराकडून अमळनेर-वाळकी ही नवीन मुक्कामी बस सेवा दि. २८ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे वाळकीसह मार्गावरील विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागांतर्गत अमळनेर आगारातून ही सेवा सुरू करण्यात आली असून, ही बस मुक्कामी बस म्हणून चालविली जाणार आहे. बस रात्री ८.३० वाजता अमळनेरहून वाळकीकडे रवाना होणार असून, वाळकी येथे मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी सकाळी अमळनेरकडे मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे सकाळी शाळा व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी तसेच कामानिमित्त शहराकडे येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या बससेवेचा विटनेर, मालखेडा, बुधगाव, अनवर्दे, जळोद आणि घोडेगाव या गावांनाही फायदा होणार आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी बस वाळकी येथे पोहोचताच ग्रामस्थांनी तिचे स्वागत केले. यावेळी बसचे चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला.

वाळकी मार्गावरील ग्रामस्थ, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाकडून गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर मुक्कामी एसटी सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. अखेर अमळनेर आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी ही मागणी मान्य करून बससेवा सुरू केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. नागरिकांनी अमळनेर आगाराचे आभार मानले आहेत. प्रवाशांनी या बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अमळनेर आगाराच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *