महिन्यात अवघे तीन दिवस पाणी, तरी २४ टक्के व्याजासह पाणीपट्टीची तुघलकी वसुली; अमळनेरकर नागरिक संतप्त

नियमित पाणीपुरवठा नाही, पण पालिकेची करवसुली मात्र कडक; व्याजमाफीसाठी आंदोलनाचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील नागरिकांना नगरपालिका प्रशासनाकडून तब्बल आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने भर उन्हाळ्यात पाण्यासाठी अक्षरशः वणवण फिरण्याची वेळ आली आहे. एकीकडे पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे पालिका प्रशासन नागरिकांकडून पाणीपट्टीच्या नावाखाली तुघलकी वसुली करत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

शहरात महिनाभरात अवघे तीन दिवस पाणीपुरवठा होत असतानाही नागरिकांकडून वार्षिक तब्बल १८०० रुपये पाणीपट्टी आकारली जात आहे. एवढ्यावरच न थांबता थकीत पाणीपट्टीवर तब्बल २४ टक्के व्याजदराने पालिकेने ३१ मार्चअखेर ३९ लाख २२ हजार १३८ रुपयांची व्याजवसुली केल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

विशेष म्हणजे, सध्या पालिकेत सत्ताधारी गटात असलेले माजी आमदार शिरीष चौधरी यांनी जुलै २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाणीपट्टीवरील दोन टक्के शास्तीची वसुली थांबविण्यासाठी पत्र दिले होते. तसेच शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचे नगरसेवक यांनी मागील प्रशासक काळात याच व्याजवसुलीविरोधात मोर्चे, आंदोलने आणि घोषणाबाजी करत प्रशासनावर जोरदार टीका केली होती.

“तुघलकी वसुली बंद करा”, “व्याजमाफी करा” अशा घोषणा देत मुख्याधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणारे आणि प्रतिकात्मक सुरा भेट देत प्रशासनाला धारेवर धरणारे हेच नगरसेवक आता सत्तेत आल्यानंतर मात्र शांत झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

दरम्यान, माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी तथा शहर विकास आघाडीच्या माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या कार्यकाळात १८०० रुपयांची वाढीव पाणीपट्टी लागू करण्यात आली होती. त्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वी नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे शहर विकास आघाडीचे नगरसेवक आता पाणीपट्टीच्या मुद्द्यावर ‘मूग गिळून गप्प’ बसल्याची टीका सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

सध्या शहरात तीव्र उष्णतेची लाट असताना अनेक भागांतील नागरिकांना जलकुंभ, टँकर किंवा खासगी पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. काही भागांत महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत असून त्याचा दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. नियमित आणि ठोस पाणीपुरवठा व्यवस्था नसतानाही पालिका प्रशासन मात्र करवसुलीत कुठलीही तडजोड करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

“महिन्यात फक्त तीन दिवस पाणी देणाऱ्या पालिकेला नागरिकांकडून पूर्ण पाणीपट्टी आणि त्यावर २४ टक्के व्याज आकारण्याचा नैतिक अधिकार आहे का?” असा सवाल आता शहरभर उपस्थित केला जात आहे. विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी पाणीपट्टीवरील व्याज तात्काळ रद्द करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

 

नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा

 

“पालिकेकडून तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याची बचत करून पालिका प्रशासनास सहकार्य करावे.”

गणेश शिंदे, मुख्याधिकारी, नगर परिषद, अमळनेर 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *