
अमळनेरात ६६ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचा फज्जा! नऊ वर्षांपासून संथगती काम
शहरात ठिकठिकाणी ड्रेनेज चोकअप; गलवाडे रोडवर दूषित पाण्याचे तळे, नागरिक झाले त्रस्त
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत तब्बल ६६ कोटी रुपये खर्चून राबविण्यात येणारी भुयारी गटार योजना ठेकेदाराच्या संथगती कामामुळे पूर्णपणे कोलमडली असून शहरात ठिकठिकाणी ड्रेनेज चोकअपची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या या योजनेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मुख्य रस्ता असलेल्या गलवाडे रोडवरील प्रमुख पेट्रोल पंपासमोर भुयारी गटार योजनेचे चेंबर गेल्या महिनाभरापासून चोकअप झाले आहे. या चेंबरमधून दूषित पाणी रस्त्याच्या कडेला साचून उघड्यावर तळे निर्माण झाले आहे. या मार्गावरून दररोज नागरिकांची मोठी वर्दळ असते. रहिवाशांच्या सोयीसाठी टाकण्यात आलेली ड्रेनेज लाइन आज पूर्णपणे निकामी ठरली असून भुयारी गटारचे चेंबर फुटून सांडपाणी रस्त्यालगतच्या मोकळ्या मैदानात साचत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष असून ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच भुयारी गटार योजनेचे काम वर्षानुवर्षे संथगतीने करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने त्वरित पावले न उचलल्यास नागरिक आंदोलनाच्या मार्गावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुर्गंधीयुक्त, शेवाळलेल्या पाण्यातून काढावी लागते वाट
या मैदानाच्या शेजारीच ग्लोबल व्ह्यू इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी, पालक तसेच रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीयुक्त, शेवाळलेल्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होऊनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Leave a Reply