पाडळसरे धरणाच्या कुशीत विलीन झाल्या लोकनेते अजितदादांच्या अस्थी

अस्थीविसर्जनावेळी अश्रूंनी भरले आभाळ, हजारोंनी घेतले अंतिम दर्शन

 

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या राजकारणात विकासाचा ध्यास आणि जनतेशी नाळ जोडणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे लोकनेते, दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थींचे मंगळवारी पाडळसरे धरणावर अत्यंत शोकाकुल वातावरणात विसर्जन करण्यात आले. माजी मंत्री व आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते, शेकडो पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अस्थीविसर्जन करण्यात आले.

स्व. अजितदादा पवार यांचा अस्थिकलश मंगळवारी दुपारी अमळनेर येथे दाखल झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी अस्थिकलश ठेवण्यात आला होता. राष्ट्रवादी तसेच महायुतीतील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व दादाप्रेमींनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. यानंतर अस्थिकलशाची भव्य व भावनिक रथयात्रा पाडळसरे धरणाकडे निघाली. आमदार अनिल पाटील यांनी ओपन जिप्सीत स्वतःच्या हातात अस्थिकलश धारण केला होता. अमळनेर–धार–मारवड–कळमसरे–पाडळसरे या मार्गावरून ही यात्रा मार्गस्थ झाली. वाटेत प्रताप कॉलेजच्या प्रवेशद्वारावर, धार व मारवड येथील सु.ही. मुंदडे हायस्कूलमध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी पुष्पवृष्टी करत श्रद्धांजली अर्पण केली. प्रत्येक गावात रथयात्रा थांबवून ग्रामस्थांनी दर्शन घेत ‘अजितदादा अमर रहें’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अखेर पाडळसरे धरणावर आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते विधीवत अस्थीविसर्जन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेत्या प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, उमेश नेमाडे, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, रविंद्र नाना पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अमळनेर तालुका, जळगाव जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासकामांच्या रूपाने स्वर्गीय अजितदादांच्या आठवणी सदैव जिवंत राहतील, अशीच भावना यावेळी प्रत्येकाच्या मनात होती.

 

आमदार अनिल दादा झाले भाऊक..

 

दोन वर्षांपूर्वी ज्या पाडळसरे धरणाच्या कामांना गती देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी अजितदादा स्वतः येथे आले होते, त्याच धरणावर आज त्यांच्या अस्थींचे विसर्जन करावे लागत असल्याची भावना प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रू बनून वाहत होती.“ज्या धरणावर हजारो शेतकरी बांधवांची प्रगती अवलंबून आहे, त्याच धरणाच्या कुशीत अजितदादा कायमस्वरूपी विसावावेत आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा या भूमीतून मिळत राहो,” अशी भावनिक प्रार्थना आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *