३४ वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांचा अमळनेरात नागरी सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद येथील सुपुत्र तथा नाशिक ग्रामीण येथून उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) पदावरून सेवानिवृत्त झालेले वासुदेव देसले यांचा अमळनेर येथे नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून सेवेत दाखल झालेल्या वासुदेव देसले यांनी तब्बल ३४ वर्षे प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावली. त्यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात मान्यवरांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत समाजसेवा, पर्यटन, अध्यात्म आणि विविध क्षेत्रांत योगदान देण्याचे आवाहन केले.

अमळनेर येथील इंदिरा भवनात शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, “आज आयुर्मान वाढले असून निवृत्तीनंतरही अनेक संधी उपलब्ध आहेत. पोलीस अधिकाऱ्याची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता मनाला भावणारे क्षेत्र निवडून समाजहिताचे कार्य करा. प्रत्येकाच्या जगण्याला एक हेतू असावा आणि आपल्या कामाचा समाजाला लाभ झाला पाहिजे,” असे सांगितले. पोलीस खात्यातील शिस्त आणि वेळेचे नियोजन ही देसले यांची मोठी ताकद असल्याचेही त्यांनी नमूद केले. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पोलीस सेवेत कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नसल्याची खंत व्यक्त करताना, “अडचणी असूनही तुम्ही दोन्ही मुलांना वैद्यकीय क्षेत्रात घडविले, ही मोठी उपलब्धी आहे. यामागे सुषमा देसले यांचीही मोलाची साथ आहे,” असे गौरवोद्गार काढले. यु. ओ. चौधरी यांनी, “आता आयुष्यातील धावपळ पुरेशी झाली. दोघांनी मिळून तीर्थयात्रा करा आणि जीवनाचा आनंद घ्या,” असा स्नेहपूर्ण सल्ला दिला.

माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी आपल्या खास शैलीत, “प्रथम सहकुटुंब पर्यटन करा. त्यानंतर पुढे काय करायचे ते ठरवा. राजकारण आता महागडे झाले आहे. हवे तर घरात सुंदर देव्हारा सजवा आणि शांतपणे प्रार्थना करत आयुष्याचा आनंद घ्या,” असे मार्मिक मत व्यक्त केले. या वेळी सुषमा देसले यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “साहेब आम्हाला वेळ देण्याची इच्छा ठेवत; मात्र पोलीस खात्यातील जबाबदाऱ्या आड येत. त्या शिस्तीची आम्हालाही सवय झाली. त्यांच्या प्रेरणेमुळेच मी राजकारणात आले. कोविड काळातील अनुभवही आमच्यासाठी मोठा धडा ठरला.” माजी आमदार दिलीप सोनवणे आणि ॲड. ललिता पाटील यांनीही देसले यांच्या सेवाकार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना वासुदेव देसले म्हणाले, “माझ्याही आयुष्यात अनेक अडथळे आले. मात्र संकटांसमोर कधीही खचून न जाता मी खंबीरपणे उभा राहिलो. संकटे हीच खरी गुरु असतात; ती माणसाला खूप काही शिकवून जातात. गरज ही शोधाची जननी असते. ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सेवा केली आणि त्यातून मला मनस्वी समाधान लाभले.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी, “पदाला चिकटून राहण्यापेक्षा त्या पदावर उत्कृष्ट काम करून ठसा उमटविणे महत्त्वाचे असते. वासुदेव देसले यांच्याकडे सहा पदव्या असून ते अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे आहेत. ते भविष्यात कोणतेही क्षेत्र निवडले तरी निश्चित यशस्वी होतील,” असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर अशोक आधार पाटील, सुरेश पिरण पाटील, योगेश देसले, जे. एम. पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष संभाजी पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, फ्रुटसेलचे अध्यक्ष भागवत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आर. बी. पाटील, हिरालाल पवार, सुरेश पाटील आणि सचिन पाटील यांनी परिश्रम घेतले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *