
२४ तास पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे नागरिक हैराण; तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात सुरू असलेल्या २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रभाग क्रमांक १४ मधील बालाजीपुरा, शाळा क्रमांक ६ परिसर तसेच उर्दू शाळेजवळील रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत आपल्या समस्या मांडल्या आहेत.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २४ तास पाणीपुरवठा या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जेसीबीद्वारे करण्यात येणारे खोदकाम निष्काळजीपणे होत असल्याने अनेक घरांच्या नळजोडण्या तुटत आहेत. तसेच पाईपलाईन तुटल्यानंतर त्यांची वेळेवर दुरुस्ती होत नसल्याने काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय, रस्ते खोदून ठेवले असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून दैनंदिन हालचालींमध्येही अडचणी वाढल्या आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी व ठेकेदारांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रभाग १४ मधील नगरसेवकांनी पाठपुरावा करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी कामात गती आणून तुटलेल्या नळजोडण्या तातडीने दुरुस्त कराव्यात, पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच निष्काळजीपणाबाबत जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन योग्य उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनावर हर्षला महेश्वारी, धर्मेंद्र जाधव, इंद्रजित पाटील, रंजना भादलीकर, अर्चना बाळापुरे, सिमा बाळापुरे, मधुकर बाळापुरे, समाधान पाटील, सुरेश पाटील, देवाजी ठाकूर यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.

Leave a Reply