
“कोटींचा दंड, बोटींचा धडाका..! सावखेडा वाळू घाटावर प्रशासनाचा मोठा झटका”ठेकेदारांना फटका..
वाळू घाटावर प्रशासनाची धडक कारवाई; १२ बोटी, १० पोकलेन, ६ डंपर जप्त, ठेकेदाराला १ कोटी ७४ लाखांचा दंड

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा येथील वाळू घाटावर शासनाच्या अटी व शर्तींचा भंग करून बेकायदेशीररित्या वाळू उपसा सुरू असल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुघे यांच्या आदेशानुसार महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई केली. या कारवाईत १२ बोटी, १० पोकलेन मशिन, ६ डंपर तसेच ४८ ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून संबंधित ठेकेदाराला तब्बल १ कोटी ७४ लाख ४९ हजार ३४४ रुपयांच्या दंडाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील सावखेडा येथील गट क्रमांक २३९, २५१, २५२, ३ आणि ५ लगतच्या तापी नदी पात्रातील वाळू ठेका शीतल एंटरप्रायझेसला देण्यात आला होता. मात्र शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून नदीपात्रात बोटी व पोकलेन मशिनच्या साहाय्याने सर्रास वाळू उपसा केला जात असल्याची तक्रार धावडे येथील सरपंच ॲड. उमाकांत पाटील यांनी प्रशासनाकडे केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुघे यांच्या आदेशानुसार तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, चोपडा येथील पोलीस उपअधीक्षक आणासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मंडळाधिकारी कल्याणी पाटील, प्रभारी पुरवठा निरीक्षक सचिन निकम यांच्यासह सुमारे २० महसूल कर्मचारी व २० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन संयुक्त कारवाई केली.
पथकाने सावखेडा येथील नदीपात्रात छापा टाकला असता १२ बेकायदेशीर बोटी आणि १० पोकलेन मशिनद्वारे वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. घाटावर ६ डंपर वाळू वाहतुकीसाठी सज्ज अवस्थेत उभे होते. तसेच उत्खननस्थळी डिझेलचे १० कॅनही आढळून आले. महसूल विभागाने सर्व मशिनरी जप्त करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ तसेच पोटकलम ७ व ८ आणि महाराष्ट्र शासनाच्या ४ जून २०२१ च्या असाधारण राजपत्रातील तरतुदीनुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. जप्त मशिनरीवर १ कोटी ४७ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून जळगाव जिल्हा खनिज प्रतिष्ठानासाठी दंडाच्या १० टक्के प्रमाणे १४ लाख ७० हजार रुपये आकारण्यात आले आहेत. तसेच ४८ ब्रास वाळूवर १२ लाख ७९ हजार ३४४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. अशी सर्व मिळून एकूण १ कोटी ७४ लाख ४९ हजार ३४४ रुपयांची दंडात्मक नोटीस संबंधित ठेकेदाराला बजावण्यात आली आहे.
२४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिलेल्या नोटिशीत २४ तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, मुदतीत खुलासा न मिळाल्यास नियमानुसार शास्तीची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाळू वाहतूक पूर्णपणे ठप्प
दरम्यान, अमळनेर महसूल विभागाच्या या धडक कारवाईनंतर तालुक्यातील पाचही वाळू ठेक्यांवरील वाळू वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. नेहमी वेगाने धावणारे डंपर विविध हॉटेल, पेट्रोलपंप आणि रस्त्यांच्या कडेला थांबलेले दिसून आले. काही वाहनमालकांनी आपले डंपर घरीच उभे करून ठेवले होते. वाळू ठेक्यांची मुदत ९ जूनपर्यंत असली तरी काही ठेक्यांची वाळू वाहतुकीची क्षमता संपल्याचेही बोलले जात आहे.

Leave a Reply