
डासांच्या वाढत्या प्रादुर्भावावर तातडीने उपाययोजना करा; आम आदमी पक्षाची नगरपरिषदेकडे मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) पावसाळ्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या अमळनेर तालुका शाखेने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देत शहरभर तातडीने जंतुनाशक औषध फवारणी व धूर फवारणी करण्याची मागणी केली आहे.
तालुका अध्यक्ष महेंद्र लक्ष्मण साळुंखे आणि तालुका उपाध्यक्ष चितामण देवरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील केवळ एखाद्या विशिष्ट भागात नव्हे, तर सर्वच प्रभागांमध्ये डासांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढला असून, काही भागांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचेही निदर्शनास येत आहे. मात्र, परिस्थिती गंभीर असतानाही नगरपरिषदेमार्फत नियमितपणे डास प्रतिबंधक औषध फवारणी किंवा धूर फवारणी होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून शहरातील प्रत्येक प्रभाग, गल्ली आणि बोळांमध्ये तात्काळ जंतुनाशक औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सायंकाळच्या वेळी डासांचा प्रादुर्भाव अधिक असल्याने नियमित धूर फवारणी करण्यात यावी, साचलेली गटारे स्वच्छ करून त्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात यावी आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन नगरपरिषदेने तातडीने सर्व प्रभागांमध्ये फवारणीचे आदेश द्यावेत व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती सकारात्मक आणि प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा आम आदमी पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply