
‘नमस्ते दिवस’निमित्त सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान; पीपीई किट व आयुष्मान भारत कार्डचे वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या नमस्ते (नॅशनल ॲक्शन फॉर मेकनाइझ्ड सॅनिटेशन इकोसिस्टम) अभियानांतर्गत अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने ‘नमस्ते दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. इंदिरा गांधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांना पीपीई किट आणि आयुष्मान भारत कार्ड यांचे वाटप करण्यात आले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील, स्वच्छता निरीक्षक संतोष जाधव आणि किरण कंडारे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधत शहराची स्वच्छता व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, घंटागाडी चालक, वाहक तसेच प्रक्रिया केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याणासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना नमस्ते योजनेची माहिती देण्यात आली तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना नमस्ते योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या पीपीई किटचे वितरण रामकृष्ण पाटील, संतोष जाधव, किरण कंडारे आणि शहर समन्वयक गणेश गढरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटपही करण्यात आले. यावेळी शहरातील विविध भागांत कचरा वेचणाऱ्या नागरिकांनी स्वच्छता विभागाशी संपर्क साधून नमस्ते योजनेअंतर्गत नाव नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागातील योगेश पवार, श्यामराव करंदीकर, महेंद्र बिऱ्हाडे, अनंत संदानशिव आणि युनूस शेख यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अशा उपक्रमांमुळे त्यांचा सन्मान वाढून स्वच्छता सेवेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply