
तीन महिन्यांच्या विलंबानंतर अमळनेर बस आगाराचे काँक्रिटीकरण सुरू; १.९४ कोटींच्या कामाला अखेर गती
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर बस आगारातील वाहनतळाच्या काँक्रिटीकरणाचे रखडलेले काम अखेर ९ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. १ कोटी ९४ लाख ६८ हजार ५४५ रुपयांच्या या कामाचा कार्यादेश ६ जुलै २०२६ रोजी देण्यात आला होता. मात्र, तीन महिने उलटूनही काम सुरू झाले नव्हते. अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने खड्डे, उखडलेली खडी, धूळ आणि पावसाळ्यातील चिखलामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक येथील कार्यकारी अभियंत्यांनी ६ जुलै २०२६ रोजी मेसर्स व्ही. टी. परदेशी अँड सन्स या ठेकेदाराला काँक्रिटीकरणाच्या कामाचा कार्यादेश दिला होता. कार्यादेश क्रमांक १३/२०२६-२७ नुसार या कामाची स्वीकारलेली निविदा रक्कम १ कोटी ९४ लाख ६८ हजार ५४५ रुपये आहे. कार्यादेश जारी झाल्यापासून सहा महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक असतानाही तीन महिने उलटून गेले, तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती.
काम रखडल्यामुळे बस आगारातील प्रवाशांना उखडलेली खडी, खड्डे आणि धुळीचा त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात चिखलामुळे गैरसोय आणखी वाढली होती. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसपर्यंत पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत २८ सप्टेंबर रोजीही वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी काम सुरू करण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही काम सुरू न झाल्याने ८ ऑक्टोबर रोजी पुन्हा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, ९ ऑक्टोबरला, काँक्रिटीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. मात्र, काम सुरू होण्यास तीन महिने विलंब का झाला, या विलंबाची जबाबदारी निश्चित होणार का आणि उर्वरित काम निर्धारित मुदतीत पूर्ण होणार का, असे प्रश्न अद्याप कायम आहेत.
आता संबंधित अधिकाऱ्यांनी कामावर नियमित देखरेख ठेवून काँक्रिटीकरण दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे. अनेक महिन्यांपासून गैरसोय सहन करणाऱ्या प्रवाशांना काम सुरू झाल्याने दिलासा मिळाला असला, तरी प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता आणि वेळेत होणारी पूर्तता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कामाला सुरुवात झाली, आता ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply