पालिकेने भूखंड १२३ वरील अतिक्रमित १० टपऱ्या हटवल्या

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपरिषदेने भूखंड क्रमांक १२३ मधील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली असून, पहिल्याच टप्प्यात सुमारे १० टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत. व्हाईट बिल्डिंगजवळील पक्की बांधकामे तसेच इतर अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अतिक्रमण न हटविल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल, अविनाश बिऱ्हाडे, चंदु बिऱ्हाडे, राज रामराजे, जितेंद्र चावरीया, दर्शन बिऱ्हाडे, सुनील संघिले, विकास बिऱ्हाडे आणि विशाल सपकाळे यांच्या पथकाने गेल्या चार दिवसांपासून भूखंड क्रमांक १२३ मधील दुकानदार, टपरीधारक आणि शेडधारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या तोंडी सूचना दिल्या होत्या. मात्र, काही दुकानदार स्वतःहून अतिक्रमण काढण्याचे सांगून टाळाटाळ करीत असल्याने अखेर पालिकेच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. या कारवाईत सुमारे १० टपऱ्या हटविण्यात आल्या. व्हाईट बिल्डिंगजवळ काही जणांनी पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले होते. हे बांधकाम हटविण्याची प्रक्रिया सुरू असताना एका व्यक्तीने पालिका कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर काही नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यावर पक्की घरे आणि दुकाने असलेल्या संबंधितांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून न घेतल्यास पालिकेकडून ते हटविण्यात येईल. या कारवाईत होणाऱ्या नुकसानीस संबंधित दुकानदारच जबाबदार राहतील, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *