
ज्ञान माणसाला अर्थपूर्ण बनवते; खानदेश ही ज्ञानवंतांची खाण” : डॉ. आशुतोष रारावीकर
अमळनेरच्या शारदीय व्याख्यानमालेचे आमदार अनिलदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
अमळनेर (प्रतिनिधी) “ज्ञान माणसाला समृद्ध बनवते. विचारमंथनातून ज्ञान मिळते आणि ते माणसाचे जीवन अर्थपूर्ण बनवते. खानदेश ही ज्ञानवंतांची खाण असून, अहिराणी आणि लेवा गणबोली जपण्याचे काम खानदेशातून होत आहे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व साहित्यिक डॉ. आशुतोष रारावीकर (मुंबई) यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठी वाङ्मय मंडळ आणि आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शारदीय व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रविवारी (ता. ११) सायंकाळी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. आशुतोष रारावीकर यांनी ‘नवरंग अर्थपूर्ण जीवनाचे’ या विषयावर विचार मांडले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, बाजार समितीच्या संचालिका सुषमा देसले, डॉ. रवींद्र कुलकर्णी, विना रारावीकर आणि डॉ. उदय देशपांडे उपस्थित होते. प्रास्ताविक मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी केले. यावेळी मंडळाच्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आपल्या मनोगतात मराठी वाङ्मय मंडळाच्या सांस्कृतिक चळवळीचे कौतुक केले. साने गुरुजींच्या या कर्मभूमीचा सांस्कृतिक ठेवा जपण्याचे कार्य अमळनेरात सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्यामध्ये प्रेम, त्याग, कर्तृत्व आणि संघर्ष यांचे विविधांगी रंग भरलेले असतात, असेही त्यांनी नमूद केले. पुढे बोलताना डॉ. आशुतोष रारावीकर म्हणाले, “क्षितिजावर दिसतात त्यांना रंग म्हणतात. पाण्यावर दिसतात त्यांना तरंग म्हणतात. मनाच्या गाभाऱ्यात कल्पना सुचतात त्यांना अंतरंग म्हणतात. हेच रंग जीवनाला अर्थपूर्ण बनवतात.” साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अमळनेरने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शहरात दोन वेळा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन होणे ही उल्लेखनीय बाब असून, अमळनेरात सांस्कृतिक चळवळ मोठ्या प्रमाणात रुजली असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी वाङ्मय मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उल्लेखही मान्यवरांनी आपल्या भाषणांतून केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम पवार यांनी केले, तर भय्यासाहेब मगर यांनी आभार मानले.

Leave a Reply