
४० हजार मतदार ‘एएसडी’ यादीत; १७ ऑगस्टपर्यंत बीएलओशी संपर्क न केल्यास नावावर टांगती तलवार
अमळनेर (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू असून तब्बल ४० हजार मतदारांची नावे ‘एएसडी’ यादीत समाविष्ट झाल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे ‘एएसडी’ यादीत नाव असलेल्या मतदारांनी १७ ऑगस्टपर्यंत संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मतदार यादीतील दुबार, मृत, स्थलांतरित तसेच प्रत्यक्ष वास्तव्य नसलेल्या मतदारांच्या नोंदी शोधण्यासाठी बीएलओमार्फत घराघरांत जाऊन माहिती संकलित करण्यात आली आहे. या पडताळणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे ‘एएसडी’ यादीत आढळून आली आहेत.
‘एएसडी’ म्हणजे अनुपस्थित, स्थलांतरित आणि मयत मतदारांची यादी. या यादीतील प्रत्येक नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यकतेनुसार अपात्र नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ‘एएसडी’ यादीत नाव आल्याने घाबरण्याचे कारण नसून संबंधित मतदारांनी त्वरित प्रशासनाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
एखाद्या जिवंत व सध्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात वास्तव्यास असलेल्या पात्र मतदाराचे नाव ‘एएसडी’ यादीत समाविष्ट झाले असल्यास त्यांनी आवश्यक पुरावे व माहिती संबंधित बीएलओकडे सादर करावीत. त्यानंतर संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.
प्रशासनाने नागरिकांना आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाहीत याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्वतःचे किंवा कुटुंबातील कोणत्याही पात्र सदस्याचे नाव ‘एएसडी’ यादीत असल्यास १७ ऑगस्टपूर्वी संबंधित बीएलओशी संपर्क साधून आवश्यक माहिती सादर करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, स्थलांतरानंतरही जुन्या ठिकाणी कायम असलेली नावे, मृत व्यक्तींच्या नोंदी तसेच प्रत्यक्ष वास्तव्य नसलेल्या मतदारांच्या नोंदींची सखोल पडताळणी केली जात आहे. पात्र मतदाराचे नाव चुकीने वगळले जाऊ नये आणि मतदार यादी अधिक अचूक व विश्वासार्ह बनावी, यासाठी नागरिकांनी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी केले आहे.

Leave a Reply