
युवा चैतन्य फाउंडेशनतर्फे मारवड जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य व पाणी जार वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत युवा चैतन्य फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन पाणी जार भेट देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. मारवड विकासमंचचे संस्थापक तथा आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन शाळेचे माजी विद्यार्थी, युवा चैतन्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा उद्योजक इंजिनिअर परेश मगर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला.
३ जुलै २०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारवडचे सरपंच भिकनराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख वैशाली पाटील, मारवड हायस्कूलचे माजी प्राचार्य एल. जी. चौधरी, युवा चैतन्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इंजिनिअर परेश मगर, फाउंडेशनचे मार्गदर्शक सदस्य तथा सेवानिवृत्त शिक्षक किशोर मगर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे, श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष शेखर पाटील, पंकज भदाणे, मनोज बागुल, मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, उपशिक्षक गिरीष पाटील, सविता पाटील, चेतना वानखेडे आणि सुधीर पाटील उपस्थित होते.
यावेळी एल. जी. चौधरी यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत शाळेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. किशोर मगर यांनी युवा चैतन्य फाउंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. तर इंजिनिअर परेश मगर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करत जीवनात शिक्षणासोबतच निर्व्यसनी राहण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर पाटील यांनी केले, तर आभार गिरीष पाटील यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या युवा चैतन्य फाउंडेशनच्या या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply