अमळनेर पोलिसांची धडक मोहीम; उघड्यावर मद्यपान करणाऱ्या १७ जणांवर केली कारवाई

गलवाडे रोड व गांधलीपुरा परिसरात विशेष कारवाई; कायदा मोडणाऱ्यांना पोलिसांचा इशारा

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अमळनेर पोलिसांनी विशेष धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांविरोधात राबविण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १७ जणांवर कारवाई करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस प्रशासनाकडून शहरातील विविध भागांमध्ये अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गलवाडे रोड परिसरात उघड्यावर मद्यपान करताना आढळलेल्या १२ जणांविरोधात कारवाई करण्यात आली. तसेच गांधलीपुरा पोलीस चौकीलगत असलेल्या कॉम्प्लेक्स परिसरात मद्यपान करणाऱ्या आणखी ५ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणे, वाहतूक व सामाजिक वातावरण बिघडविणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील वाढते सार्वजनिक गैरप्रकार, नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी तसेच काही तरुणांमध्ये वाढत चाललेली चैनीची प्रवृत्ती लक्षात घेऊन ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. या कारवाईमुळे शहरात पोलीस प्रशासनाबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक सुज्ञ नागरिकांनी पोलिसांच्या कार्यवाहीचे स्वागत केले आहे. सार्वजनिक ठिकाणी गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच प्रकारच्या नियमित मोहिमा राबविण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करू

 

“शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील.”

– दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक, अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *