पात्र सफाई कर्मचाऱ्यांना योजनांचा लाभ तात्काळ द्या; मुख्याधिकाऱ्यांना मुकेश सारवान यांचे निर्देश

अमळनेर (प्रतिनिधी) : सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेर नगर परिषदेत शुक्रवारी, दि. २१ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण आढावा बैठक व पत्रकार परिषद पार पडली. पात्र सफाई कर्मचाऱ्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ कोणत्याही विलंबाशिवाय तात्काळ मिळवून द्यावा, असे निर्देश मुकेश सारवान यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना दिले.

बैठकीत दूषित व धोकादायक गटारांमध्ये काम करताना मृत्यू पावलेल्या किंवा कायमचे अपंगत्व आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक नुकसानभरपाईबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासोबतच त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी प्रतिपादन करण्यात आले. या उच्चस्तरीय आढावा बैठकीला महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान, त्यांचे स्वीय सहाय्यक राजेश सोनवणे, अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगर परिषदेचे सर्व विभागप्रमुख, विविध सफाई कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी उपस्थित होते.

 

घरांपासून वारसा हक्क नियुक्तीपर्यंत योजनांचा आढावा

 

बैठकीदरम्यान सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनमान, रोजगार, निवास आणि सुरक्षेशी निगडित विविध महत्त्वाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न, तसेच लाड-पागे वारसा हक्क नियुक्ती योजनेअंतर्गत पात्र वारसांना सेवेत सामावून घेण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली. कामाच्या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या दृष्टीने आवश्यक आधुनिक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याबाबतही प्रशासनाला सूचना करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले सर्व सुरक्षा साहित्य अर्थात सेफ्टी किट्स उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी स्पष्ट करण्यात आले. मुकेश सारवान यांनी अमळनेर नगर परिषदेमध्ये या सर्व कल्याणकारी योजनांची सद्यस्थिती जाणून घेतली. संबंधित योजनांमध्ये जे सफाई कर्मचारी पात्र आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा विलंब न करता तात्काळ लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना दिले.

 

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश

 

सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावाही घेण्यात आला. मृत आणि अपंग सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांमध्ये शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई, वारसांना मिळणारे हक्क आणि विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *