
पिंपळे रस्त्यावर गतिरोधक; वेगावर नियंत्रण, अपघातांना आळा
अमळनेर (प्रतिनिधी )शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील पिंपळे रस्त्यावर वाहनांचा वाढता वेग आणि त्यामुळे निर्माण होणारा अपघातांचा धोका लक्षात घेऊन नगरसेवक सचिन (भुरा) पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पालिकेच्या माध्यमातून रस्त्यावरील दोन महत्त्वाच्या क्रॉसिंगवर गतिरोधक बसविण्यात आल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण आले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पिंपळे रस्त्याचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण झाल्यानंतर या मार्गावरून वाहनांची वर्दळ वाढण्यासोबतच वेगही वाढला होता. विशेषतः आडव्या जोडरस्त्यांवरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनचालकांना वेगाने येणारी वाहने वेळेत लक्षात न आल्याने किरकोळ अपघातांच्या घटना घडत होत्या. शालेय विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत होता.
ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक सचिन पाटील यांनी नगरपालिकेकडे निवेदन देत धोकादायक ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर पालिकेने कार्यवाही करत दोन ठिकाणी गतिरोधक बसविले आहेत.
गतिरोधकामुळे वाहनचालकांना वेग कमी करावा लागत असल्याने क्रॉसिंगवरील धोका कमी झाला असून नागरिक, विद्यार्थी व परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी या उपाययोजनेबद्दल नगरसेवक सचिन पाटील आणि पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, पिंपळे रस्ता तसेच धुळे रस्ता ते पिंपळे रस्ता जोडणाऱ्या डी.पी. रस्त्यावरही आवश्यक ठिकाणी आणखी गतिरोधक बसविण्याची कार्यवाही पालिकेकडून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply