नांद्रीच्या तरुणाचा ‘तक्षक’ संरक्षण प्रणालीचा शोध; सैन्य सुरक्षा बळकट करण्यासाठी अभिनव संशोधन

अमळनेर (प्रतिनिधी) देशाच्या संरक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम बनवण्याचा ध्यास घेत अमळनेर तालुक्यातील नांद्री येथील २१ वर्षीय तरुणाने ‘तक्षक’ नावाची अत्याधुनिक संरक्षण प्रणाली विकसित केली आहे. अवघ्या ०.५ सेकंदात संभाव्य हल्ल्याचा वेध घेऊन तात्काळ प्रतिसाद देणाऱ्या या तंत्रज्ञानाला पेटंटही मिळाले असून, तरुण संशोधक रितेश सुनील पाटील यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अमळनेर तालुक्यातील नांद्री येथील रहिवासी असलेले रितेश सुनील पाटील हे सध्या शिरपूर येथे बी.एस्सी. (रसायनशास्त्र)चे शिक्षण घेत आहेत. लहानपणापासून विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड असलेल्या रितेश यांनी देशाच्या सुरक्षेसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा निर्धार केला आणि त्यातून ‘तक्षक संरक्षण प्रणाली’चा जन्म झाला.

अमेरिका सारख्या प्रगत देशांकडे आधुनिक संरक्षण यंत्रणा उपलब्ध असून संभाव्य हल्ले आधीच ओळखून त्यांना रोखण्याची क्षमता आहे. मात्र, भारतात अनेकदा शत्रू घुसखोरी करून बॉम्ब किंवा क्षेपणास्त्र हल्ले करतो, ज्यामुळे मोठे नुकसान होते. याच पार्श्वभूमीवर रितेश यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक संरक्षण प्रणाली विकसित केली आहे.

‘तक्षक’ प्रणाली ३६० अंशांमध्ये कार्य करत लिडार, उष्णता सेन्सर, रडार आणि अल्ट्रासोनिक तरंगांच्या साहाय्याने परिसराचे स्कॅनिंग करते. अवघ्या ०.५ सेकंदात मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून एआय प्रणालीला त्वरित निर्णय घेण्यास मदत करते. यामुळे शत्रूची कोणतीही यंत्रणा आपल्या हद्दीत प्रवेश करताच त्याची माहिती मिळून तात्काळ संरक्षणात्मक कारवाई करता येते.

ही प्रणाली सैन्याच्या वाहनांमध्ये बसवता येणार असून, शत्रूचा हल्ला होण्यापूर्वीच त्याचा शोध घेऊन तो निष्प्रभ करण्याची क्षमता या यंत्रणेत आहे. शत्रू जवळ येताच ही प्रणाली त्याचा मागोवा घेऊन आवश्यक असल्यास प्रति-हल्ला करून धोका टाळू शकते. त्यामुळे सैनिकांचे प्राण वाचवणे शक्य होणार आहे.

सध्या सैन्याच्या सुरक्षेसाठी अत्यंत महागड्या यंत्रणांचा वापर केला जातो. मात्र, ‘तक्षक’ प्रणाली सुमारे ५ लाख रुपयांत कार्यान्वित होऊ शकते, अशी माहिती रितेश यांनी दिली. यामुळे केवळ उच्चपदस्थ व्यक्तींचीच नव्हे तर सामान्य सैनिकांच्या वाहनांचीही सुरक्षा अधिक मजबूत होऊ शकते. रितेश पाटील यांनी आपल्या या संशोधनाचे पेटंट स्वतःच्या नावावर मिळवले आहे. तसेच, ही प्रणाली देशाच्या संरक्षण दलात वापरली जावी यासाठी त्यांनी खासदार स्मिता वाघ यांची भेट घेऊन या प्रकल्पाची माहिती दिली आहे.

ग्रामीण भागातील एका तरुणाने विकसित केलेली ही अत्याधुनिक प्रणाली भविष्यात भारतीय संरक्षण व्यवस्थेसाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता व्यक्त होत असून, रितेश पाटील यांच्या या यशामुळे अमळनेर तालुक्याचा गौरव वाढला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *