
पिंपळे येथे शेताच्या वादातून दोन गटांत हाणामारी; महिलांचा विनयभंग, सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे येथे शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना ३० जुलै रोजी घडली. या प्रकरणात महिलांचा विनयभंग, मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून अमळनेर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत पिंपळे येथील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ३० जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पिंपळे बुद्रुक येथील गट क्रमांक १८/१/अ/१ मध्ये त्या काम करीत होत्या. त्यावेळी धुळे येथील देवपूर परिसरातील सुदर्शन कॉलनीतील रहिवासी वैशाली दिलीप पवार हिने फिर्यादी महिलेचा हात धरून तिला खाली पाडले. त्यानंतर भूषण दिलीप पवार हा अंगावर धावून आला आणि मारहाण करू लागला. त्याने महिलेचे ब्लाउज फाडून बरगड्यांवर बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
महिलेचे पती, सासू आणि सासरे भांडण सोडविण्यासाठी आले असता वैशाली दिलीप पवार, भूषण दिलीप पवार आणि दिलीप पुरुषोत्तम पवार यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दिलीप पुरुषोत्तम पवार याने महिलेचे सासरे अनिल संपत सूर्यवंशी यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. तसेच महिलेच्या पती व सासूलाही चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी पुन्हा शेतात पाय ठेवला तर जिवंत मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात वैशाली दिलीप पवार, भूषण दिलीप पवार आणि दिलीप पुरुषोत्तम पवार या तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम ७४, ११५(२), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पिंपळे येथील गट क्रमांक १८/१/अ/१ ही शेतजमीन त्यांनी अनिल संपतराव पाटील यांच्याकडून विकत घेतली होती. मात्र, अनिल संपतराव पाटील हे सदर जमीन पुन्हा त्याच भावात मागत असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ३० जुलै रोजी फिर्यादी महिला, त्यांचे पती व मुलगा हे पेरणीसाठी ट्रॅक्टर आणि बियाणे घेऊन शेताकडे जात असताना अनिल संपतराव पाटील, भूषण अनिल पाटील, माया अनिल पाटील, योगिता भूषण पाटील, अशोक चुडामन पाटील, सर्व रा. पिंपळे, तसेच राहुल अनिल पाटील यांचे सासरे, रा. फापोरे यांनी ट्रॅक्टर अडवला. शेतात ट्रॅक्टर नेऊ नका, अन्यथा ट्रॅक्टरखाली जीव देऊन तुमचे नाव सांगून जाऊ, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी योगिता भूषण पाटील हिने फिर्यादी महिलेची गच्ची धरून तिला खाली पाडले. त्यानंतर भूषण अनिल पाटील याने महिलेचे ब्लाउज फाडून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचा आरोप आहे.
महिलेचे पती भांडण सोडविण्यासाठी गेले असता अनिल संपतराव पाटील याने त्यांच्या हातावर व डोक्यावर काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच इतरांनीही चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अनिल संपतराव पाटील, भूषण अनिल पाटील, माया अनिल पाटील, योगिता भूषण पाटील, अशोक चुडामन पाटील, सर्व रा. पिंपळे, तसेच राहुल अनिल पाटील यांचे सासरे, रा. फापोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११८(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ७४, ७६, १२६, ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कविता ठाणगे करीत आहेत.

Leave a Reply