अमळनेर तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा; १ हजार ५० घरांत पाणी, कोट्यवधींचे नुकसान

शहरातील सुमारे ७००, तर ग्रामीण भागातील ३५० घरांना फटका; पंचनामे आणि दुरुस्तीची कामे सुरू

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात दि. ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले. एकाच दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे १ हजार ५० घरांमध्ये पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर नुकसानग्रस्त नागरिक आता घरातील चिखल, गाळ आणि खराब झालेले साहित्य बाहेर काढत सावरासावर करण्याच्या कामाला लागले आहेत. दुसरीकडे प्रशासनाकडून पंचनामे, नुकसानीचे सर्वेक्षण आणि पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

अमळनेर शहरात अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी शिरले. शहरातील सुमारे ७०० घरे नुकसानग्रस्त झाली आहेत. घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांच्या मोटारसायकली, चारचाकी वाहने, फ्रीज, दूरचित्रवाणी संच, पाण्याच्या मोटारी, इन्व्हर्टर, सोफे, फर्निचर तसेच अन्य संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहरातील वाहन दुरुस्तीच्या गॅरेजवर मोटारसायकलींची मोठी गर्दी दिसून आली. अनेक नागरिक आपल्या वाहनांची दुरुस्ती करून घेण्यासाठी धावपळ करत होते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने फ्रीज, दूरचित्रवाणी संच आणि अन्य उपकरणे दुरुस्तीसाठी दुकानांमध्ये आणली जात आहेत. शिवांश हबमधील खालचे गाळे पूर्णपणे पाण्यात गेल्याने तेथील दुकानदारांचेही मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे व्यावसायिकांचे साहित्य आणि माल खराब झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर आणि उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांच्यासह बाजार समिती, गलवाडे रोड, प्रसाद नगर, भालेराव नगर, सप्तशृंगी कॉलनी आदी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. नुकसानाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक तयार ठेवण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे तालुक्यात घरांपासून वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, रस्ते आणि शासकीय कार्यालयांपर्यंत विविध क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पंचनामे जलदगतीने पूर्ण करून नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाची मदत तातडीने मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

बोरीच्या पुराचा पाणीपुरवठा योजनेलाही फटका

 

तालुक्यातील बोरी नदीला आलेल्या पुरामुळे काही ठिकाणी रस्ते उखडले असून पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे. अमळनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधील सात ते आठ पाईप पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास काही कालावधी लागू शकतो. नागरिकांनी या परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील ३५० घरांना फटका

अतिवृष्टीचा फटका ग्रामीण भागालाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. मारवड, कळमसरे यासह तालुक्यातील अन्य गावांमध्ये घरांमध्ये पाणी घुसल्याने सुमारे ३५० घरांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांनी दिली. गावोगावी नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक रस्ते बंद झाले होते. काही ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांची ये-जा ठप्प झाली होती. अमळनेर शहरातील बोरी पुलावरूनही पुराचे पाणी वाहत असल्याने एसटी वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली.

 

एसटीच्या २३३ फेऱ्या रद्द

 

अतिवृष्टी आणि रस्त्यांवरील पुराच्या पाण्यामुळे अमळनेर आगाराच्या अमळनेर तालुक्यातील १९४ फेऱ्या, तर पारोळा तालुक्यातील ३९ फेऱ्या, अशा एकूण २३३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या फेऱ्या रद्द झाल्याने एसटी महामंडळाचेही आर्थिक नुकसान झाले. सुमारे १० हजार ५०० किलोमीटर वाहतूक रद्द झाल्याने अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती वाहतूक निरीक्षक मुकेश सैंदाणे यांनी दिली. जळगाव, चोपडा, पारोळा, धुळे, नाशिक, संभाजीनगर, पंढरपूर आदी मार्गांवरील फेऱ्यांवर त्याचा परिणाम झाला.

 

शासकीय कार्यालयांनाही पुराचा फटका

 

अतिवृष्टीमुळे उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयातही पाणी शिरले. त्यामुळे शासकीय कार्यालयांतील साहित्याचेही नुकसान झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *