
मांडळ ग्रामपंचायतीला दिव्यांगांचा इशारा; ५ टक्के निधी न मिळाल्यास ‘अन्नत्याग’ करणार
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथे दिव्यांगांच्या ५ टक्के निधीची अंमलबजावणी होत नसल्याने गावातील दिव्यांग बांधवांनी संताप व्यक्त केला आहे. या मागणीसाठी बुधवारी (दि. ४) राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष शांताराम सखाराम कोळी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. तसेच ‘अन्नत्याग’ करण्याचा इशारा देण्यात आला.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील नियम ३७ नुसार, ग्रामपंचायतीने त्यांच्या स्व-उत्पन्नातील ५ टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीचा स्वतःचा महसूल (कर, शुल्क इ.) यातून गोळा होणाऱ्या निधीतील ठराविक हिस्सा दिव्यांगांच्या विकासासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. मांडळ ग्रामपंचायतीने हा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी ग्रामसेवक प्रांजल वाघ आणि सरपंच दीपक बडगुजर यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष शांताराम कोळी यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की, “दिव्यांगांच्या हक्काच्या निधीबाबत जर ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले, तर सर्व दिव्यांग बांधव ग्रामपंचायत कार्यालयासमोर ‘अन्नत्याग उपोषण’ करतील.” या प्रसंगी कोळी समाज जिल्हाध्यक्ष रावसाहेब कोळी, समाजसेवक संदीप सर, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका उपाध्यक्ष वासुदेव पवार यांच्यासह दीपक बडगुजर, जितेंद्र कोळी, अमृत कोळी, नागो महाजन, हिरामण मराठे, ईश्वर कोळी, शांताराम पारधी, मांगुलाल भोई, संजय पाटील, रमेश वाकडे, दिनेश भिल, कैलास धनगर, जफर शेख, दानिश बेग तसेच रेखाबाई पारधी, मोनीबाई कोळी, जयश्री कोळी, सुनंदाबाई कोळी, चंदनबाई महाजन यांच्यासह गावातील अनेक दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply