
सुरेल गीतांनी रंगली अमळनेरची सांगीतिक मैफल
अमळनेर (प्रतिनिधी) : गीत बहार म्युझिकल ग्रुप, अमळनेर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “सुरीला सफर – जुन्या नव्या अजरामर हिंदी गीतांचा कार्यक्रम” मराठा मंगल कार्यालय, पटवारी कॉलनी येथे मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाला शहरातील संगीतप्रेमी रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभागृह खचाखच भरले होते.
सायंकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या या विनामूल्य कार्यक्रमात जुन्या आणि नव्या काळातील अजरामर हिंदी गीतांची बहार अनुभवायला मिळाली. सुमधुर गीतांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन पूजा शहा यांनी करून कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली. गीत बहार म्युझिकल ग्रुपचा हा पहिलाच कार्यक्रम असून श्याम सदानशिव यांच्या मार्गदर्शनाखाली नवोदित गायक-गायिकांनी आपल्या गायन कौशल्याची उत्कृष्ट छाप पाडली. पूर्वा वशिष्ठ, शुभांगी खंडाळे आणि शितल बनसोडे या गायिकांसह श्याम सदानशिव, उज्ज्वल पाटील, अनिल बनसोडे आणि सुनिल भोई यांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांपासून ते आजच्या काळातील लोकप्रिय गीतांपर्यंतचा हा “सुरीला सफर” प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात अनुभवला. प्रत्येक गीताला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोमल साऊंड सर्व्हिस, अमळनेर यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. गीत बहार म्युझिकल ग्रुपच्या या सांस्कृतिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून भविष्यातही अशा दर्जेदार कार्यक्रमांची अपेक्षा रसिकांकडून व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply