
निम्न तापी प्रकल्प पाडळसे प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव द्यावे
आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीना पत्र देऊन केली मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसे प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच जलसंपदा मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, निम्न तापी प्रकल्प पाडळसे, हा तापी नदीवरील अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा या तालुक्यातील ४३ हजार ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच १७.१ टी.एम.सी. पाणी अडविण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाने शेती व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी सुध्दा पाणी राखीव असल्याचे नियोजन आहे. एवढा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पाठपुराव्याने मंत्रीमंडळ बैठकीत डिसेंबर, २०२४ मध्ये ४ हजार ८९० कोटी रुपये एवढी चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य शासनाने दिली. त्यानंतर शासनाने प्रकल्प केंद्रीय जलआयोग यांच्याकडे प्रकल्प मान्यतेसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर प्रकल्प केंद्रीय जलआयोगने इतर संबंधित विभागाच्या वैधानिक मान्यता प्राप्त झाल्या त्यात महत्वाचे म्हणजे राज्याचा हिस्सा देण्याची हमी अजितदादा पवार यांच्या मार्फत राज्य वित्त आयोग यांनी दिल्यानंतरने शिफारस करुन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे प्रकल्प पाठविण्यात आला. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने विशेष अधिकार समितीची मान्यता घेऊन प्रकल्पाला प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना या योजनेत समाविष्ट करण्यात आला. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे जलपुजन अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन केले होते. परंतु त्यांच्या पाठपुराव्याने हा प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. आज दुर्देवाने ते आपल्यात नसल्याने या प्रकल्पाला अजितदादा पवार निम्न तापी प्रकल्प पाडळसे, ता. अमळनेर, जि. जळगाव असे नावास मान्यता द्यावी, अशी विनंती आमदार अनिल पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply