स्मशानभूमीच्या वाटेवरही अंधाराचे काटे ! लाखोंचे दिवे गेले कुठे? ट्रॅक्टरच्या उजेडात आप्तस्वकीयांना अखेरचा निरोप!

मारवड-गोवर्धन स्मशानभूमी मार्गावरील १४ पथदिवे बंद; लाखोंचा निधी खर्चूनही दोन महिन्यांत सुविधा निकामी

अमळनेर (प्रतिनिधी) माणसाच्या आयुष्यातील सर्वांत दुःखद क्षण म्हणजे आपल्या आप्तस्वकीयांना अखेरचा निरोप देण्याची वेळ. अशा वेळी कुटुंबीयांना आधाराची गरज असताना तालुक्यातील मारवड आणि गोवर्धन येथील ग्रामस्थांना मात्र अंत्यविधीसाठीही अंधाराशी सामना करावा लागत आहे. दोन्ही गावांच्या संयुक्त स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले १४ पथदिवे अवघ्या पंधरा दिवसांत बंद पडले आहेत. काही विद्युत खांब उन्मळून पडल्याने संपूर्ण मार्ग अंधारात बुडाला आहे. परिणामी, रात्री अंत्यविधीची वेळ आल्यास ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या उजेडात आप्तस्वकीयांचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधेसाठी खर्च झालेला लाखोंचा निधी नेमका गेला कुठे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मारवड आणि गोवर्धन या दोन्ही गावांची संयुक्त स्मशानभूमी गोवर्धन शिवारात गावापासून दूर आणि आडबाजूला आहे. रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना अंधाराचा त्रास होऊ नये, यासाठी आमदार निधीतून जुलै महिन्यात स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर १४ पथदिवे बसविण्यात आले होते. मात्र, ही सुविधा सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच दिवे बंद पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यातच विद्युत खांब योग्य खोलीपर्यंत रोवण्यात आले नसल्याने काही खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारलेली प्रकाशव्यवस्था प्रत्यक्षात उपयोगाची ठरलेली नाही.

 

दुःखाच्या क्षणीही ग्रामस्थांची कुचंबणा!

 

एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आपल्या प्रिय व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठीही पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसणे, यापेक्षा दुर्दैवी परिस्थिती कोणती? स्मशानभूमीच्या मार्गावर पथदिवे असूनही ते बंद असल्याने रात्री अंत्यविधीची वेळ आल्यास ट्रॅक्टरच्या हेडलाईटचा उजेड करून अंत्यसंस्कार उरकावे लागत आहेत. मृत व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप देण्याच्या प्रसंगी अशा प्रकारची गैरसोय सहन करावी लागणे, ही ग्रामस्थांसाठी वेदनादायी बाब ठरत आहे. लाखोंचा निधी खर्चूनही अंधार कायम असेल, तर या कामाचा उपयोग नेमका काय, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

 

ठेकेदाराकडे तक्रारी करूनही दुरुस्ती नाही!

 

बंद पडलेले पथदिवे आणि उन्मळून पडलेले विद्युत खांब याबाबत संबंधित ठेकेदाराला वारंवार कळवूनही दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अवघ्या काही दिवसांतच काम निकामी होत असेल, तर पथदिव्यांच्या कामाची गुणवत्ता तपासण्यात आली होती का? विद्युत साहित्य दर्जेदार वापरण्यात आले होते का? खांबांची उभारणी योग्य पद्धतीने झाली होती का? काम पूर्ण झाल्यानंतर त्याची पाहणी कोणी केली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक निधीतून झालेल्या कामाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही जोर धरत आहे.

 

लाखोंच्या निधीचा चुराडा; कामाची गुणवत्ता तपासा :  करण सुनील साळुंखे

 

सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष करण सुनील साळुंखे यांनीही या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागरिकांच्या सुविधांसाठी खर्च होणारा सार्वजनिक निधी अवघ्या काही दिवसांत निष्प्रभ ठरत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. केवळ काम पूर्ण झाल्याचे दाखवून देयके अदा झाली की प्रत्यक्षात दर्जेदार आणि टिकाऊ काम झाले, याची तपासणी झाली होती का, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधित ग्रामपंचायत प्रशासन, ठेकेदार आणि जबाबदार यंत्रणेने तातडीने बंद पथदिवे सुरू करावेत, उन्मळून पडलेले खांब योग्य पद्धतीने पुन्हा उभे करावेत आणि संपूर्ण स्मशानभूमी मार्गावर सुरक्षित प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण सुनील साळुंखे यांनी केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *